जलजीवन मिशनमध्ये सोलापूर झेडपीची सुमार कामगिरी ; पाणीपुरवठा विभागाच्या सचिवांनी व्यक्त केली नाराजी

केंद्र शासनाच्या हरघर जल योजनेत सोलापूर जिल्हा परिषदेचे कामगिरी सुमार ठरले आहे राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे सचिव वृषभ यशवंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    सोलापूर: केंद्र शासनाच्या हरघर जल योजनेत सोलापूर जिल्हा परिषदेचे कामगिरी सुमार ठरले आहे राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे सचिव वृषभ यशवंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    केंद्र शासनाने ग्रामीण विभागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून जलजीवन मिशनअंतर्गत हर घर नल ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी द्यायची आहे. या योजनेसाठी सोलापूर जिल्हा परिषदेने 1 हजार 19 गावांपैकी 939 गावांसाठी 1 हजार कोटींचा आराखडा केंद्र शासनाला सादर केला आहे. केंद्र शासनाने हा आराखडा मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात 820 च्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे करण्याआधी जिल्हा परिषदेने गावातील कुटुंबांना नळजोडणी करून ऑनलाईन माहिती भरणे आवश्यक आहे. पण या कामात सोलापूर जिल्हा परिषद मागे पडली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचा राज्यात 32 वा क्रमांक असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी टेंडरचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा योजनेच्या वर्कऑर्डरही दिलेल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मात्र वर्कऑर्डर वादात अडकलेल्या आहेत. वेळेत कामे होत नसल्याने राज्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या सचिवांनी ऑनलाइन आढावा बैठकीत अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

    सांगोल्याची केंद्रापर्यंत तक्रार…

    सांगोला तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत केंद्राच्या सचिवापर्यंत झेडपीचे माजी सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी तक्रार केली आहे. पाणीपुरवठा विभागाने नुकतेच दोनशे कामांचे टेंडर जाहीर केले होते. यातील 14 कामांचे टेंडर रिकॉल केले आहे. इतर टेंडर मंजूर करून वर्कऑर्डर देण्याची वेळही संपली आहे. पण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी हे टेंडरमध्येच अडकले आहेत. प्रत्येक घराला नळजोडणी व सुरू असलेल्या कामाची पाहणी कोण करणार हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे जिल्हा परिषदेच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.