
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सुरू असलेल्या शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून राजे समरजितसिंह घाटगे शेतकऱ्यांना चांगला ऊस दर व सुविधा देत आहेत. या माध्यमातून त्यांनी शेतकरी व आपल्या प्रजेचे हित साधले आहे.
कागल / नवराष्ट्र नेटवर्क न्यूज : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सुरू असलेल्या शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून राजे समरजितसिंह घाटगे शेतकऱ्यांना चांगला ऊस दर व सुविधा देत आहेत. या माध्यमातून त्यांनी शेतकरी व आपल्या प्रजेचे हित साधले आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश (Darshana Jardosh) यांनी काढले.
येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यास सदिच्छा भेट व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेत्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. मंत्री जरदोश यांचा शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा भेट देऊन यथोचित सत्कार केला.
मंत्री जरदोश पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी पारदर्शीपणे विविध योजना राबविल्या जात आहेत. वस्त्रोद्योग खात्याच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नागरिकांनी नमो ॲप डाऊनलोड करून पंतप्रधानांशी थेट संवाद साधावा काही सूचना करावयाच्या असतील तर कराव्यात.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विविध योजना भाजप व शाहू ग्रुपच्या माध्यमातून तळागाळात पोचवित आहोत. विशेषतः शेती क्षेत्रासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला आहे. ते शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून ड्रोन तंत्रज्ञान व सीएनजीचलित ट्रॅक्टरसारख्या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या बांधावर पोचविता आहोत. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून टेक्स्टाईलमधील केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना असतील त्या प्रभावीपणे राबवू, असेही ते म्हणाले.