गुंड गणेश मारणे फरार, विठ्ठल शेलारसह १७ जणांवर मोक्का; गुन्हे शाखेची कारवाई

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, टोळीप्रमुख तसेच गुंड विठ्ठल शेलारसह गणेश मारणे आणि इतर १७ जणांवर मोक्कानुसार कारवाई केली आहे. तत्पुर्वी गुंड गणेश मारणे हा अद्यापही फरार असून, पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे.

  पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, टोळीप्रमुख तसेच गुंड विठ्ठल शेलारसह गणेश मारणे आणि इतर १७ जणांवर मोक्कानुसार कारवाई केली आहे. तत्पुर्वी गुंड गणेश मारणे हा अद्यापही फरार असून, पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस जंगजंग पछाडत असतानाही तो हाती लागत नसल्याचे वास्तव आहे.

  टोळीप्रमुख गुंड विठ्ठल शेलार, गणेश मारणे, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, रामदास मारणे यांच्यासह १५ जणांना आत्तापर्यंत अटक केली आहे. तर, गणेश मारणे हा फरार आहे.

  कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा (५ जानेवारी) साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि इतर दोघांनी घरासमोरच भरदिवसा गोळ्या झाडून खून केला. या खूनानंतर पुण्यात चांगलीच खळबळ माजली होती. गोळ्या झाडून फरार झालेल्यांना त्याच रात्री गुन्हे शाखेने दोन वकिलांसह आठ जणांना पकडले होते.

  त्याच्या चौकशीत आर्थिक व जमीनीच्या वादातून आणि साहिल व नामदेव कानगुडे यांच्यातील वादातून खून केल्याची समजले होते. दरम्यान, पुढच्या चौकशीत गुंड विठ्ठल शेलार तसेच गणेश मारणे यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मात्र, शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली. गुन्हेगारीतील वर्चस्व वाद तसेच टोळी युद्धातून खून केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी लागलीच विठ्ठल शेलारसह रामदास मारणे याला बेड्या ठोकल्या. तर, गणेश मारणे फरार झाला. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत आहे.

  गणेश मारणे फरारच

  शरद मोहोळचा खून झाल्यानंतर काही वेळातच गणेश मारणे याने त्याचा मोबाईल बंद करत इतरसोबत असलेल्या पाच जणांना देखील त्यांचे मोबाईल बंद करून टाकण्यास सांगितले. तिघांना माघारी पाठवत तो दोघांना सोबत घेऊन पसार झाल्याची माहिती पोलीस सुत्रांची माहिती आहे. तेव्हापासून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. गुन्हे शाखेकडून त्याचा कसून शोध घेतला जात असतानाही तो मिळत नाही. दुसरीकडे गणेश मारणेने अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सर्वच आवक झाले आहेत. न्यायालयातून तो अटकपुर्व घेणार की पोलीस पकडणार असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.