हातकणंगले कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे बोंब मारो; जुनी पेन्शनसाठी कर्मचारी आंदोलनावर ठाम

सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या तिसऱ्या दिवशी आंदोलनाची (Kolhapur Agitation) तीव्रता वाढली असून, आंदोलकांनी जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचे काम केले.

हातकणंगले : सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या तिसऱ्या दिवशी आंदोलनाची (Kolhapur Agitation) तीव्रता वाढली असून, आंदोलकांनी जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचे काम केले. जोपर्यंत शासन मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा आंदोलनकर्त्यानी ठामपणे निर्धार केला.

यावेळी आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घुगरे, पर्यवेक्षक यासीन मुजावर, इन्तीयाज म्हैशाळे, रघुनाथ नांगरे, राहूल शेळके, अर्जून पाटील, जितेंद्र म्हैशाळे, कृषि सहायक तालूका अध्यक्ष शिवानंद शिरढोणे, अधिक्षक रविंद्र भोते, सुखदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

आंदोलनामध्ये महानंदा घुगरे, आरोग्य विभाग तालुका अध्यक्ष महेश वडर, परिचर संघटना अध्यक्ष विजय गवंडी, पदवीधर संघटनेचे विशाल देसाई, बी. टी. कुंभार, विनाअनुदानीत कर्मचारी संघटना राज्य उपाध्यक्ष रत्नाकर माळी, जुनी पेन्शनचे उपाध्यक्ष दिपक गायकवाड, राजमोहन पाटील यांच्यासह तालूक्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

सर्व संघटना मोर्चात सहभागी

तिसऱ्या दिवशी सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी शासनावर हल्लाबोल केला. प्रचंड घोषणा देत अंदोलनकर्त मोर्चात सामील झाले. तालूक्यातील सर्व संघटना मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलासह चारशे ते पाचशे कर्मचारी उपस्थित होते. खोतवाडी हायस्कूलचे सचीन कांबळे यांनी एकच मिशन, जुनी पेशन हे स्वरचीत गाणे गायिले. या गाण्यावर अंदोलनकर्त्यानी ताल धरला.

शासकीय कार्यालयात शुकशुकाट

सरकारी कर्मचाऱ्यांमुळे सरकारी रूग्णालये, शाळा, महाविद्यालये, पालिका, काही सरकारी विभागातील कामकाज ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शासकीय-निमशासकीय कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला त्यामुळे शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. नेहमीच गजबलेला परिसर संपामुळे शांत हाेता. कमी वर्दळ दिसून आली.