“मिंध्यांचे ‘खोके’ सरकार मंत्रिमंडळ बैठकीसाठी मराठवाडयात; पण काही ‘खोकी’ शेतकऱ्यांच्या खर्ची पडतील का?” सामनातून सरकारवर शेलक्या शब्दात टीका

दुष्काळाच्या संकटात काळवंडलेल्या मराठवाडय़ाला व मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना या वरवरच्या रंगरंगोटीने काय मिळणार आहे? ऐन पावसाळय़ात ओढवलेले दुष्काळाचे संकट, सततची नापिकी आणि डोक्यावरील कर्जाच्या असहय़ बोजामुळे मराठवाडय़ात रोज कुठे ना कुठे शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.

    मुंबई –  गेल्या आठ महिन्यांमध्ये मराठवाडय़ात (marathwada) 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे हे उच्चांकी प्रमाण शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि अत्यल्प पावसामुळे मराठवाडय़ावर ओढवलेले दुष्काळाचे भीषण सावट पाहता आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. कमालीचे नैराश्य आणि वैफल्य यामुळे मराठवाडय़ातील शेतकरी रोज मृत्यूला कवटाळत असतानाच मिंध्यांचे ‘खोके’ सरकार (government) मंत्रिमंडळ बैठकीसाठी मराठवाडय़ात येत आहे. जीवन संपवायला निघालेल्या मराठवाडय़ातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या बैठकीतून काही ‘खोकी’ खर्ची पडतील काय?, असा सवाल करत सामना अग्रलेखातून आज राज्य सरकारवर बोचरी टीका करण्यात आली आहे. (government in marathwada for cabinet meeting but will some box be spent criticism of the government from the)

    ‘एक फुल, दोन हाफ’ सरकार

    राज्यातील ‘एक फुल, दोन हाफ’ सरकार येत्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरात मुक्कामाला येत आहे. मिंधे सरकारच्या मंत्रिमंडळाची एक बैठक मराठवाडय़ात घ्यायची, हा सोपस्कार पूर्ण करण्यासाठीच ही बैठक आहे, असे दिसते. अवघे मंत्रिमंडळ शहरात येणार म्हणून सर्वत्र रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. त्यातच मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचा समारोप करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील 75 मिनिटांच्या दौऱ्यावर येणार असल्याने शहरात रंगसफेदीचे काम जोरात हाती घेण्यात आले आहे. असं सामनातून म्हटलं आहे.

    वरवरच्या रंगरंगोटीने काय मिळणार?

    दुष्काळाच्या संकटात काळवंडलेल्या मराठवाडय़ाला व मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना या वरवरच्या रंगरंगोटीने काय मिळणार आहे? ऐन पावसाळय़ात ओढवलेले दुष्काळाचे संकट, सततची नापिकी आणि डोक्यावरील कर्जाच्या असहय़ बोजामुळे मराठवाडय़ात रोज कुठे ना कुठे शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. रविवारी तर छत्रपती संभाजीनगर जिल्हय़ात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे झाले एका दिवसाचे. पण गेल्या आठ महिन्यांत मराठवाडय़ात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी 475 शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी मदतीसाठी पात्र ठरवण्यात आल्या आहेत, तर 200 हून अधिक शेतकरी कुटुंबे मदतीपासून वंचित आहेत. अशी टीका आज सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.