
Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे सरकारवर मोठा आरोप करीत टीकास्त्र सोडले आहे. यावेळी त्यांनी सरकारी नोकर भरतीला कंत्राटी करण्याच्या पद्धतीवर हल्लाबोल केला आहे.
राज्यव्यापी आंदोलन उभे करणार
इंग्रजांच्या १० इस्ट इंडिया कंपनीमार्फत खासगी नोकर भरती प्रक्रिया सुरू केल्याने शिंदे-फडणवीस पवार सरकारकडून महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या हडप करण्यात आल्या आहेत, असा आरोप वंचित बहुजन युवा आघाडी केला आहे. त्यामुळे वंचितची युवा आघाडी राज्यव्यापी आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.
आरोग्य सेवकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू
खासगी कंपन्यांमार्फत होणारी वादग्रस्त सरळसेवा भरती हा लुटीचा अजेंडा राबवत राज्य सरकारने कंत्राटी भरतीला प्रोत्साहन दिले आहे. राज्य सरकार ७५ हजार जागांची भरती करणार आहे. त्यातील तलाठी, आरोग्य सेवकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू असून, नुकतेच कंत्राटी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी १० कंपन्या मार्फत १३६ संवर्गांपैकी ८५ संवर्गातील भरतीबाबत शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे.
२३ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत पगार
यामध्ये शासन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी महाविद्यालयांच्या भरतीचाही समावेश आहे. पाच वर्षांच्या भरतीसाठी कुठलेही आरक्षण लागू राहणार नाही. सरळसेवेतून ही पदे भरली जाणार असून, २३ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहेत.
सर्वात मोठा असंवैधनिक निर्णय
कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा वेगवेगळ्या विभागात ही भरती केली जाणार आहे. हा राज्यातील तरुणाईवर केलेला सर्वात मोठा आघात आहे. यामुळे आरक्षण पूर्णपणे बाद करून ही घटनाबाह्य कृती केली जात आहे. खासगीकरणाच्या नंतर हा सर्वात मोठा असंवैधनिक निर्णय घेण्यात आला असल्याचे राजेंद्र पातोडे यांनी म्हटले आहे.
अजित पवारांचे मत
शासकीय पदांच्या कंत्राटी भरतीला कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय मागच्या सरकारच्या काळातील असल्याचे अजित पवार सांगत सुटले आहेत. मागच्या सरकारमध्ये अजित पवारांकडेच उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्री पद होते.
यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण
मागच्या सरकारने निर्णय घेतला म्हणजे त्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे असे काही बंधन विद्यमान सरकारवर नसते. गांभीर्याची बाब म्हणजे संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे कंत्राटी भरतीची जबाबदारी दिल्यामुळे खासगी कंपन्यांना रान मोकळे झाले आहे. कंत्राट मिळालेल्या काही कंपन्या राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याचे स्पष्ट आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण झाली असून कमिशन घेतले असल्याने हा निर्णय घेतला असल्याचा आरोप वंचितने केला.
वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच मुंबईमध्ये सुजात आंबेडकर आणि युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा ह्याचे प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात येत असल्याचे राजेंद्र पातोडे यांनी सांगितले.