Government Nursing College to be started in Baramati; Decision in Cabinet meeting

    बारामती : बारामती येथे शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाची बुधवारी (दि. १४) बैठक पार पडली. यावेळी राज्यात सहा ठिकाणी शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये बारामतीच्या नर्सिंग महाविद्यालयाचा समावेश आहे. त्यामुळे आता बारामतीची ‘मेडीकल हब’ ओळख अधिक गडद बनली आहे.

    बारामती शासकीय नर्सिंग महाविद्यालयही होणार सुरू

    अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालयापाठोपाठ आता बारामती शासकीय नर्सिंग महाविद्यालयही सुरू होणार आहे. राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार, गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय उभारण्यास राज्यमंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे आता बारामती शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरु होणार असल्याने पॅरामेडिकल शिक्षणाचे नवीन दालन खुले होणार आहे. बारामतीला मेडीकल हब म्हणून ओळख निर्माण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न पुर्णत्वाच्या दिशेने आहे. पवार यांच्याच पुढाकाराने बारामतीत हे महाविद्यालय सुरु होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित

    दरम्यान, येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले आहे. शासकीय नाममात्र दरात दररोज किमान ७०० रुग्ण येथे औषधोपचार घेतात. येथे सीटीस्कॅनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच एमआरआयदेखील येत्या काही दिवसांत सुरू होत आहे. तसेच, मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, माळेगाव येथे हे महाविद्यालय सुरु झाले आहे. त्याची दुसरी बॅच यंदापासून बारामतीत येणार आहे. येत्या वर्षभरात ही इमारत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रयत्न आहेत. त्यामध्ये राज्याच्या विविध भागांत कुशल वैद्यकीय मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने शासकीय नर्सिंग महाविद्यालय उभारणी लवकरच याबाबतचा अध्यादेश जारी होऊन पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे बारामतीत वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.