
पुणे जिल्ह्यातील मावळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा कारभार वाऱ्यावर आहे. शिक्षण विभागात जिल्हा परिषदेच्या २७२ शाळा असून, त्यात १७१९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मंजूर शिक्षक ९३१ असून, कार्यरत ८११ शिक्षक आहेत, १२० शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे.
वडगाव मावळ : पुणे जिल्ह्यातील मावळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा कारभार वाऱ्यावर आहे. शिक्षण विभागात जिल्हा परिषदेच्या २७२ शाळा असून, त्यात १७१९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मंजूर शिक्षक ९३१ असून, कार्यरत ८११ शिक्षक आहेत, १२० शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे.
गटशिक्षणाधिकारी पद रिक्त
त्याप्रमाणे डिसेंबर २०२२ पासून गटशिक्षणाधिकारी पद रिक्त असून, प्रभार कार्यभार शिक्षण विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज यांच्याकडे देण्यात आला आहे. केंद्रप्रमुख जागा २४ मंजूर असून, केवळ ४ केंद्रप्रमुख कार्यरत असून १२० जागा रिक्त आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी जागा ५ मंजूर असून ३ शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत असून २ जागा रिक्त आहेत. २०१४- २०१५ पासून आतापर्यंत २१ शाळा बंद झाल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात चाललंय तरी काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.
ग्रामस्थांची शिक्षक नेमण्याची मागणी
मावळ तालुक्यातील २७२ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १७१९२ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना मोफत शिक्षण, गणवेश, पाठ्यपुस्तके आदी साहित्य दिले जाते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन अनेकजण यशस्वी होत आहेत. भारताची भावी पिढी घडविण्याचे कार्य करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. मावळ तालुक्यातील काही शाळांमध्ये एक शिक्षकी शाळा सुरू आहे. शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी व ग्रामस्थ शिक्षक उपलब्ध करण्याची मागणी करत आहेत. १२० शिक्षकांच्या जागा रिक्त असून आणखी किती जागा रिक्त होण्याची प्रतीक्षा सरकार करत आहेत.
२०१४-१५ पासून आतापर्यंत २१ शाळा बंद
२०१४-१५ पासून आतापर्यंत २१ शाळा बंद झाल्या असून, खासगी शाळांमध्ये वाढ झाली आहे. शाळा बंद झाल्याने गरिबांच्या मुलांना इतरत्र शिक्षणासाठी पायपीट करावी लागत आहे. राज्यात डी एड् झालेले हजारो बेरोजगार नोकरीच्या शोधात असताना, शासन सेवानिवृत्त शिक्षकांना २० हजार रुपयांमध्ये नोकरी देणार आहेत. काही दिवसात त्यांची भरती करण्यात येणार आहे. बेरोजगार डी एड् विद्यार्थ्यांना नोकरी न देता सेवानिवृत्त शिक्षकांना नोकरी दिली जात असल्याच्या निर्णयामुळे डी एड् पात्र विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता दर्जेदार असून सर्व शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षक असतात. मावळ तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांची ही स्थिती एक तालुक्याची असून पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील स्थिती पाहिली तर चित्र भयावह झाले आहे. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण होते. आता ऑफलाइन शाळा असून शिक्षक नसल्याने उणीव भासत आहे.
अपुरे शिक्षक असल्याने अतिरिक्त ताण
राज्य शासनाने शिक्षक भरती न केल्याने शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने रिक्त जागांची संख्या वाढत आहे. मावळ तालुक्यात आयएसओ शाळा असून अद्ययावत सुविधा असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत तसेच नवोदय परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होत आहे. अपुरे शिक्षक असल्याने अतिरिक्त ताण येत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. १ ते ४ वर्गासाठी काही ठिकाणी एकच शिक्षक आहेत. मावळ तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त त्वरित भरण्याची मागणी होत आहे.
शिक्षण विभागात जिल्हा परिषदेच्या २७२ शाळा असून १७१९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १२० शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. केंद्रप्रमुख २० जागा रिक्त व शिक्षण विस्तार अधिकारी २ जागा रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे ताण पडत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- सुदाम वाळुंज, प्रभारी गटशिक्षण अधिकारी