स्वत:च्याच कानाखाली जोडे मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आलीये, सामनातून राज्यपालांवर टिका

वीर सावरकरांच्या निमित्ताने हातात जोडे घेऊन रस्त्यावर उतरणारे भाजपचे शूरवीर व मिंधे गटाचे नरवीर आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत असा सवाल त्यांनी केला.

    मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केल्याने सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणी आता शिवसेना आक्रमक झाली असून आता राज्यपालांसह भाजपवर चांगलीच सडकून टिका केली आहे. राहुल गांधीनी वीर सावरकरांबद्दल वक्तव्य केल्याने जोडे मारो आंदोलन करणाऱ्यावर आता हे सर्व जोडे स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. तर, शिवरायांचा अपमान करणार्‍यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असेही म्हण्टलंय.

    काय म्हण्टलंय सामनातून

    आधी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी त्यानंतर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेने त्यांचा खरपूस समाचार घेतला. ‘भारत जोडो’  यात्रेदरम्यान राहुल गांधींनी वीर सावकरांबद्दल वक्तव्य केलं तेव्हा त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. जोडो मारो आंदोलनं करण्यात आली. मग आता आता हे सर्व जोडे स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली असल्याचं सामनातून म्हणण्या आलं आहे.

    राज्यपालाचं वक्तव्यावर टिका

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माती खाल्ली व छत्रपती शिवरायांचा अपमान केला. मराठवाडा विद्यापीठातील एका ‘राजकीय’ सोहळ्यात राज्यपालांनी शिवरायांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली. हा विषय तूर्त बाजूला ठेवू, पण ‘‘शिवाजी महाराज हे जुनेपुराणे, कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हीरो’ आहेत’’ असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर पाय ठेवला. हे भयंकरच आहे. महाराष्ट्रात वीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा गाजत असतानाच भाजप व मिंधे गटाचा पाय त्यांच्याच राज्यपालांच्या धोतरात अडकून कपाळमोक्ष झाला आहे. राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला त्याच वेळी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची ‘माफीवीर’ म्हणून टवाळी केली. शिवाजी महाराजांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठविल्याचा भलताच इतिहास उकरून काढला व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केला. आश्चर्य असे की, वीर सावरकरांच्या निमित्ताने हातात जोडे घेऊन रस्त्यावर उतरणारे भाजपचे शूरवीर व मिंधे गटाचे नरवीर आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत? ‘‘शिवरायांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठवली’’ या विधानाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, महाराष्ट्रातील भाजप पुढार्‍यांनी शिवतीर्थावर येऊन महाराष्ट्राची माफी मागावी व अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावी, तरच त्यांचा स्वाभिमान की काय तो महाराष्ट्राला दिसेल. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी एक घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकार महाराष्ट्राच्या माथी मारले. त्यांनी राजभवनात पाय ठेवल्यापासून भारतीय घटना व शिवरायांचे विचार अरबी समुद्रात बुडवले. त्यांच्याकडून शिवरायांच्या गौरवाची अपेक्षा काय करणार! असा हल्लाबोल करण्यात आला.