bhagatsingh koshyari photo

राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल म्हणून या अभियानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाने आत्मनिर्भर विद्यापीठ होण्याचा संकल्प करावा, अशा सूचना राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी केल्या.

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मांडून भारताला सशक्त करण्यासाठी मोठे अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल म्हणून या अभियानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाने आत्मनिर्भर विद्यापीठ होण्याचा संकल्प करावा, अशा सूचना राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी केल्या.

    राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर सर्व विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते.

    राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या नेहमी अग्रेसर राज्य राहिले आहे. हा आलेख नेहमीच आपण चढता ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहात. नवीन शैक्षणिक धोरण संस्कृती आणि भारतीय ज्ञान प्रणाली आधारित नवीन संकल्पना आणि नाविन्यता यावर विशेष लक्ष केंद्रित करून शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना सुरुवातीला अडचणी येऊ शकतात परंतु यातून सकारात्मक मार्ग दाखवत विद्यार्थी हितासाठी सर्वाने कार्य करावे, असेही राज्यपाल यांनी यावेळी सांगितले.