राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा, पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली ‘ही’ विनंती; कोश्यारी म्हणाले…

"महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  मुंबई – नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.

  “महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे, की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

  राज्यपाल आणि वाद
  कोश्यारींना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी होत असतानाच, स्वत: राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच वादत असल्याचे पाहयाल मिळते. त्यांनी मुंबईत, महाराष्ट्र, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींवर वादग्रस्त वक्तव्य केलंय. तसंच, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना, राज्यपाल कोश्यारींवर ‘समांतर सरकार’ चालवत असल्याचाही आरोप झाला.

  उदयनराजेंनी सुद्धा केली होती राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी
  विरोधकांबरोबरच शिंदे गट आणि उदयनराजेंनी सुद्धा राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र भाजपकडून राज्यपालांची पाठराखण होत असल्याचा आरोप विरोधक करतायत. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद सुरु होते. पुण्यात राष्ट्रवादीनं डमी कोश्यारींचं धोतर फेडत आंदोलन केलं. उस्मानाबादेतही आंदोलकांनी धोतर फेडून प्रातनिधीक स्वरुपात अंत्ययात्रा काढली. अमरावतीत काँग्रेसनं धोतर पेटवून राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला होता. वास्तविक भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिले आहेत. उत्तराखंडातले ते भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष राहिलेत. ऊर्जा, जलसिंचन सारखी अनेक खाती त्यांनी सांभाळलीयत. दोन पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवकाचे स्वयंसेवक राहिलेले कोश्यारींनी पत्रकारिताही केलीय.