नाफेडकडून हरभरा खरेदी अचानक बंद ; ५० टक्क्यांपेक्षा जास्त हरभऱ्याचे उत्पादन शेतकऱ्यांच्या घरातच पडून

नाफेडकडून सुद्धा खरेदी प्रक्रियेला गती न मिळाल्यामुळे खरेदी प्रक्रिया रेंगाळली. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल वेळेत विकता आला नाही. परिणामी सुमारे ५० टक्के हरभरा उत्पादन विक्रीअभावी अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे.

    अकोला – नाफेडकडून अचानक हरभरा खरेदी बंद करण्यात आली आहे. तांत्रिकसह विविध अडचणीमुळे हरभरा खरेदी पूर्ण होऊ शकलेली नाही. ५० टक्क्यांपेक्षा जास्त हरभऱ्याचे उत्पादन शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. हरभरा खरेदीला मुदतवाढ देऊन खरेदी प्रक्रिया पूर्ववत करण्यासाठी पोर्टल त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्याकडे माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

    अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. यावर्षी हरभरा पिकाचे उत्पादन चांगले झाले. जिल्ह्यात सुरुवातीला एफ.सी.आय.कडून हरभरा खरेदी करण्यात आली. यंत्रणेकडील साधन सामुग्रीच्या अभावामुळे तसेच नियोजनशुन्य व्यवस्थापनामुळे हरभरा खरेदी कमी झाली, तसेच १२ एप्रिलपासून एफ.सी.आय.कडून हरभरा खरेदी बंद करण्यात येऊन नाफेड अंतर्गत खरेदी सुरु करण्यात आली.

    नाफेडकडून सुद्धा खरेदी प्रक्रियेला गती न मिळाल्यामुळे खरेदी प्रक्रिया रेंगाळली. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल वेळेत विकता आला नाही. परिणामी सुमारे ५० टक्के हरभरा उत्पादन विक्रीअभावी अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. खरीप हंगाम जवळ असल्याने शेतकऱ्यांना आपला माल विकल्या शिवाय आर्थिक नियोजन करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हरभरा विक्री शिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. नाफेडकडून खरेदी प्रक्रिया बंद झाल्याने शेतकऱ्यांना खुल्या बाजारात आपला माल विकावा लागत आहे. बाजारात हमीभावापेक्षा ८०० ते १००० रुपये प्रति क्विंटल कमी भाव असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.