ग्रामसेवक, शिक्षक नियुक्तीचा प्रश्न ऐरणीवर; अपहाराबाबत पंचायतराज समितीने मागितली माहिती

केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांसाठी आलेल्या निधीमध्ये अपहार झाल्याबाबतची माहिती पंचायतराज समितीने जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागितली आहे. त्यामुळे अपहार प्रकरणातील ग्रामसेवकांची रखडलेली चौकशी व शिक्षक बदली प्रकरणावर गंभीर चर्चा होणार असल्याचे आता सांगितले जात आहे.

  सोलापूर : केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांसाठी आलेल्या निधीमध्ये अपहार झाल्याबाबतची माहिती पंचायतराज समितीने जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागितली आहे. त्यामुळे अपहार प्रकरणातील ग्रामसेवकांची रखडलेली चौकशी व शिक्षक बदली प्रकरणावर गंभीर चर्चा होणार असल्याचे आता सांगितले जात आहे.

  पंचायत राज समिती 15 जून रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहे. समितीने जिल्हा परिषद प्रशासनाकडे विभागनिहाय 2021- 22 या वर्षापर्यंतच्या खर्चाबाबतची माहिती मागितली आहे. ग्रामपंचायत विभागाकडे विविध योजनांच्या निधीच्या अपहाराबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. किती ग्रामसेवकांनी शासकीय रकमेचा अपहार केला, त्यांच्यावर काय कारवाई झाली. रक्कम वसूल किती झाली? या अनुषंगाने प्रशासनाकडून माहिती मागवण्यात आली आहे.

  विशेष म्हणजे ग्रामसेवकांबाबत भरपूर तक्रारी आहेत. याबाबत चौकशाही पूर्ण झाल्या आहेत. पण संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करण्यास प्रशासनाने टाळाटाळ केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी यापूर्वीच केली होती. यावरून सभेत प्रचंड गोंधळ झाला होता.

  दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे ग्रामपंचायतीच्या अपहाराची चौकशी पूर्ण झाली आहे. तत्कालीन बीडीओ राहुल देसाई यांनी प्रशासनाकडे संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध कारवाई करण्याबाबत अहवाल सादर केला आहे. पण अद्याप त्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यात आलेली नाही.

  ग्रामसेवकांच्या बदल्याबाबत ही मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. निलंबित करण्यात आलेल्या ग्रामसेवकाला त्याच ग्रामपंचायतीकडे पुनर्नियुक्ती देता येत नाही, असा नियम असताना प्रशासनाने मात्र नियुक्त्या दिल्याच्या तक्रारी यापूर्वीच करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामसेवकाच्या अपहारप्रकरणाबाबत चर्चा होताना ग्रामसेवकांवरील कारवाई व बदल्यांचा प्रश्नावर गंभीर चर्चा होणार असल्याची शक्यता सदस्यांनी वर्तवली आहे.

  शिक्षक बदलीचा प्रश्न

  जिल्हा परिषद प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केलेल्या शिक्षकांच्या बदल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. उच्च न्यायालय व विभागीय आयुक्तांचा निकालाचा आधार घेऊन या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण विभागीय आयुक्तांकडे सतरा शिक्षकांचे अपील असताना 19 शिक्षकांच्या बदल्या झालेले आहेत. यावरून शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या बदल्या नेमाने झाल्या का याची चौकशी करण्यात यावी, अशी पंचायतराज समितीकडे मागणी करण्यात येणार असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.