आजीच्या डोक्यात दगड घालून नातवाने केला खून; नात्याला काळीमा फासणारी घटना

बीडच्या लोणगावमध्ये एका तरुणाने आपल्या आजीची निर्घृण हत्या केली आहे. नातवाने ७२ वर्षीय आजीच्या डोक्यामध्ये दगड घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे उघडकीस आली आहे.

    बीड : बीडमधून नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. बीडच्या लोणगावमध्ये एका तरुणाने आपल्या आजीची निर्घृण हत्या केली आहे. नातवाने ७२ वर्षीय आजीच्या डोक्यामध्ये दगड घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे उघडकीस आली आहे. कौशल्याबाई किसन राऊत असे मयत महिलेचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नातू राहुल बाळासाहेब राऊत वय २९ याच्याशी घरात किरकोळ कारणावरून आजीचा वाद झाला होता. पुढे या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यामुळे नातवाला आजीचा खूप राग आला. त्याने याचा राग मनात धरून आजी कौशल्याबाई राऊत यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. या प्रकरणी नातवाविरोधात दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    भाडेकरुकडून घरमालकाची हत्या

    पुण्यातही काल अशीच एक घटना समोर आली. घरासमोर दुचाकीचे जोरात हॉर्न वाजवून झोपमोड केल्यामुळे भाडेकरुने थेट घरमालकाची हत्या केली. भाडेकरूने मालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून मारहाण करत हत्या केली आहे. पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवी परिसरात ही घटना घडलीये. संतोष राजेंद्र धोत्रे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.