यंदा द्राक्ष निर्यात घटणार! बदलत्या वातावरणाचा फटका, शासनाकडूनही निराशा

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आगाप द्राक्षांच्या निर्यातीत सध्या तरी अडथळा निर्माण झाला आहे. अवकाळीचा फटका द्राक्षाला बसला आहे. निर्यात सुरू होण्यास आणखी दोन-तीन आठवडे लागणार असले तरी यंदा बदलत्या वातावरणाचा फटका बसून जिल्ह्यातून परदेशात होणारी निर्यात घटणार असल्याचे दिसत आहे.

  प्रवीण शिंदे, सांगली : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आगाप द्राक्षांच्या निर्यातीत सध्या तरी अडथळा निर्माण झाला आहे. अवकाळीचा फटका द्राक्षाला बसला आहे. निर्यात सुरू होण्यास आणखी दोन-तीन आठवडे लागणार असले तरी यंदा बदलत्या वातावरणाचा फटका बसून जिल्ह्यातून परदेशात होणारी निर्यात घटणार असल्याचे दिसत आहे.

  दरम्यान शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणताही भरीव लाभ दिलेला नाही, पीक विमा मिळत नाही, शासनाकडून भरपाई मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत आहेत.सध्या पडत असलेल्या दाट धुक्यांमुळे द्राक्षमण्यांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण तयार होत आहे.

  यंदा किमान निर्यातीत ४० टक्के घटीची शक्यता आहे. द्राक्ष बागायतदारांसमोर संकटाचे वादळ घोंघावत राहणार असल्याचे चित्र दिसते. जिल्ह्यातून निर्यातीचा आलेख खाली उतरणार आहे. परिणामी जिल्ह्यात येणारे परदेशी चलन यंदा कमालीचे घटणार आहे.गेल्या काही दिवसात सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत, वाळवा आणि पलूस या द्राक्ष पट्ट्यात वादळी वाऱ्याने आणि अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. परिणामी यंदा जिल्ह्यातून द्राक्षे निर्यात घटणार असल्याचे दिसत आहे.

  सन २०२३-२४ वर्षासाठी शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षबागेची ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार आहे. द्राक्ष निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी, तपासणी, कीड व रोगमुक्त हमी, एगमार्क प्रमाणिकरण फायटोसॅनिटरी प्रमाणिकरण या सर्व बाबींचे ‘अपेडा’च्या सहकार्याने ग्रेपनेट प्रणालीद्वारे प्रभावी अंमलबाजवणी करण्यात येत आहे. युरोपियन युनियनसह अन्य देशांना द्राक्ष निर्यातीकरिता कीड व रोगमुक्त, उर्वरित अंश हमी देण्यासाठी सन २००४ पासून राज्यात अपेडाच्या सहकायनि ग्रेपनेट प्रणालीद्वारे नोंदणी होते. सन २०२२-२३ मध्ये ३१ हजार ८११ निर्यातक्षम बागांची नोंदणी झाली होती.

  धुक्यात होत आहेत स्वप्न धूसर
  भारतात द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड केली जाते. जिल्ह्यातून निर्यात सुरू होण्यास सुरुवात होण्यास अजून दोन आठवड्याचा कालावधी बाकी आहे, तो पर्यंत पडत असलेल्या धुक्यामुळे द्रक्षेवर फळकुज, दावण्या, बुरी यासारखे प्रादुर्भाव वाढत आहेत.

  वातावरण ढगाळ आहे. झालेल्या पावसामुळे दव पडत असून त्यामुळे फुलांतल्या बागांचे नुकसान होत आहे. त्याचा परिणाम पुढे देखील निर्यातीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान समतोल राहिला तर लवकर या संकटातून द्राक्ष बागायतदार बाहेर येऊ शकतील.

  -संदीप शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी

  सांगली जिल्ह्यातील निर्यात अशी

  वर्ष………..शेतकरी संख्या……..निर्यात क्षेत्र (हेक्टरमध्ये)
  २०१९…….२१३५……………….११७७.४१
  २०२०……..४२८४…………..…..२३१६.९८
  २०२१……..५९६८…………..……३३५५.७६
  २०२२………९५२४………….……५३१३.२६
  २०२३……….४४८५..……………..६५६७.३६