म्हसवड पोलीस ठाण्याची दंबग कामगिरी! दरोडा घालणारी आंतरजिल्हातील टोळी गजाआड 

मोटार सायकलवरुन घरी परतणाऱ्या शिक्षक दांपत्यास चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना म्हसवड परिसरात घडली. पोलीसांनी याची गंभीर दखल घेत लावलेल्या सापळ्यात ३ आरोपींना जेरबंद करण्यास यश मिळाले.

    म्हसवड : मोटार सायकलवरुन घरी परतणाऱ्या शिक्षक दांपत्यास चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना म्हसवड परिसरात घडली. पोलीसांनी याची गंभीर दखल घेत लावलेल्या सापळ्यात ३ आरोपींना जेरबंद करण्यास यश मिळाले.सदर घटनेची फिर्याद म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल होताच, म्हसवड पोलीस स्टेशनचे स.पो.नि. बाजीराव ढेकळे यांनी तात्काळ याची गंभीर दखल घेत चोरट्यांच्या टोळीस जेरबंद केले.

    याबाबत म्हसवड पोलीस स्टेशनकडून समजलेली अधिक माहिती अशी, म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात गत काही दिवसांमध्ये जबरी चोरीचे प्रमाण वाढले होते. दिनांक ०१ ऑगस्ट रोजी रात्री ०९ वा. च्या सुमारास म्हसवड येथून स्वतःच्या मोटार सायकलने जात असताना शिक्षक दापंत्यास जबरी मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी देवून त्यांच्या अंगावरील सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम असा ५५,००० रुपयाचा ऐवज दरोडेखोरांनी चोरुन नेला असल्याची फिर्याद म्हसवड पोलीसांत दाखल करण्यात आली. त्यांनतर स.पो.नि. ढेकळे यांनी सदर गुन्ह्यांची खबर मिळताच पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अजित बोहाडे, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, व डॉ. निलेश देशमुख, पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग, यांना याबाबतची माहिती देत म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. बाजीराव ढेकळे यांनी याबाबत गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देवून त्या अनुषंगाने लगतच्या तालुक्यात व जिल्ह्यात शोधपथके पाठविली होती.

    सदर गुन्ह्यांच्या तपासात स्वतः सपोनि बाजीराव ढेकळे यांनी लक्ष घालत आरोपी इतर ठिकाणी दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असताना पथकासह जावून सापळा रचून तीन आरोपीना शिताफीने पकडुन जेरबंद केले. त्यांची नावे अनिल उर्फ संदीप दिलीप लवटे, रा. मेडद ता. माळशिरस जि. सोलापूर, कृष्णा रोहीदास भोंडवे, रा. राणंद ता. माण जि. सातारा व संतोष मानसिंग सुर्यवंशी रा. कळसकरवाडी ता. माण जि. सातारा अशी असून त्यांनी भाटकी रस्त्यावरुन जाणारे वाटसरुंना चाकुचा धाक दाखवत लुटल्याची कबुली देवून जबरी चोरी केलेला मुद्देमाल दिला असता तो पोलीसांनी हस्तगत केलेला आहे.

    सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक,अजित बोऱ्हाडे, व उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग डॉ. निलेश देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बाजीराव ढेकळे सहा. पोलीस निरीक्षक, पो.ना.अमर नारनवर, पो.ना. किरण चव्हाण, पो.कों.सुरज काकडे, पो.कॉ. अनिल वाघमोडे, पो.कॉ.नवनाथ शिरकुळे, पो.कॉ. संतोष बागल, पो.कॉ. रविकिरण गुरव यांनी केली असुन त्यांचे म्हसवड परिसरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.