pattern of Pune Police
pattern of Pune Police

  पुणे : तक्रार अर्जावर तत्काळ कारवाई करा अन् तो अर्ज निकाली काढावा, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतरदेखील काही पोलीस ठाण्यांकडून याकडे गांर्भीयाने घेतली जात नसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी नागरिकांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी नो पेन्डन्सी या धर्तीवर प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना जलद न्याय मिळणार आहे, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.

  बेसिक पोलिसींगवर भर

  पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्विकारल्यापासून बेसिक पोलिसींगवर भर दिला आहे. त्यासोबतच नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार, आलेला अर्ज प्रलंबित न ठेवता तो सात दिवसात निकाली काढावा असे आदेश दिलेले आहेत. मात्र, काही पोलीस ठाण्यांकडून असे होत नसल्याचे दिसत आहे.

  अपुऱ्या मनुष्य बळावर काम करावे

  दरम्यान, परिमंडळ पाच हा सर्वात जास्त गुन्हेगारी असलेला परिसर म्हणून पाहिला जातो. त्याठिकाणी कामाचा ताण देखील मोठा असतो. अपुऱ्या मनुष्य बळावर काम करावे लागते. दरम्यान, या परिमंडळ पाचमध्ये मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर, वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी, मार्केटयार्ड अशी पोलीस ठाणी आहेत. या सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाण्याकडे कारवाईच्या अनुषंगाने तब्बल १ हजार २०० हून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. हेच प्रलंबित अर्ज मार्गी काढण्यासाठी स्वतः पोलीस उपायुक्त आर. राजा हे अर्ज निकाली काढण्याच्या द़ृष्टीने लक्ष देणार आहेत. त्यात दोन सहायक पोलीस निरीक्षक आणि प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी व कर्मचारी मदतीला असणार आहे.

  तक्रार निवारण दिवस आयोजित करण्यामागचे प्रयोजन

  प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत तक्रार निवारण दिवस असणार आहे. गुन्हे योग्य अर्ज असतील तर अशा गुन्ह्यात दोन्ही बाजू समजून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. हे अर्ज समोपचाराने निकाली काढता येतात का ? हे देखील तक्रार निवारण दिवस आयोजित करण्यामागचे प्रयोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अर्ज निकाली काढण्याच्या दृष्टीने अर्जातील वादी आणि प्रतिवादी यांना प्रत्यक्षरित्या कर्मचार्‍यांद्वारे या तक्रार निवारण दिवसाच्या वेळी हजर राहण्यास सांगण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे हे अर्ज निकाली निघण्यास मदत होणार असल्याचे उपायुक्त आर. राजा म्हणाले.