पालकमंत्री भुसे अन‌ संजय राऊत आमने-सामने! शांतता बिघडवण्याचा अनेकांचा प्रयत्न असल्याचा राऊत यांचा आरोप 

    त्र्यंबकेश्वर : हे मंदिर अतिशय शांतता असलेली ही वास्तू आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जात आहे. मी तेव्हा पण येऊ शकलो असतो पण येथील शांतता भंग होईल म्हणून मी येथे येणे टाळले. राजकारण करण्यासाठी अनेक जागा आहेत, ही काही राजकारण करण्याची जागा नाही. पण काही जण याठिकाणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. काही जण धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण गावकऱ्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. गोदावरी जवळजवळ इथून गायब झाली आहे. यासंदर्भात विकास झाला पाहिजे, अशा ऐतिहासिक जागांच्या विकासासाठी प्राधिकरण झाले पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. त्र्यंबकेश्वर दाैऱ्यावर असताना राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला.
    दरम्यान, पालकमंत्री दादा भूसे आणि खा. संजय राऊत हे एकाचवेळी संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पाेहाेचले, यावेळी दाेन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी केली. मात्र हे दाेन्ही नेते एकमेकाकडे न बघता सरळ निघून गेले. खासदार संजय राऊत यांनी बाेलताना आ. नितेश राणे यांच्यावरही तिखट शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, हिंदू अजिबात खतरे में नाही, ते स्वत: खतरे में आहेत. हिंदूत्व नाही तर, नेता खतरे में है! हिंदू खतरे में है, असं म्हणत आंदोलन करण्यात आल्याचे ते म्हणाले.
     संजय राऊत यांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यामुळे त्या वादग्रस्त प्रकरणाला पुन्हा उजाळा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी संदल मिरवणुकीत काही तरुण मंदिरात जाण्याचा प्रयत्न केल्याने वाद झाला होता. या मिरवणुकीत धूप दाखवण्याची परंपरा असल्याचं संजय राऊत यांनी वक्तव्य केले होते. याच वक्तव्याला आवाहन देत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. अशी कुठलीही धूप दाखवण्याची परंपरा नाही. संजय राऊत यांनी ते सिद्ध करून दाखवावं, असं म्हणत नितेश राणे आणि आचार्य तुषार भोसले यांनी आव्हान दिलं होतं. त्याला आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
    राऊत यांनी बाेलताना शिंदे गटाच्या नेत्याचे नाव घेताच थुंकल्याचे कॅमेऱ्यात दिसले हाेते. याबाबत बाेलताना राष्ट्रवादीचे नेते, विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी सर्वांनीच संयमाने वागले पािहजे, असा सल्ला दिला हाेता. याबाबत विचारले असता खा. राऊत संतापले अन‌ धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेले बरे असे म्हणत अजित पवारांना टाेला लगावला. संयम सर्वांनी राखावा, हे त्यांचे म्हणणे बराेबर आहे पण पण ज्याचे जळते त्याला कळते. आम्ही भोगतो आहोत, अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी अजितदादांवर टीका केली. आम्ही भोगूनही जमिनीवर आहोत. इकडे तिकडे पळालो नाही. माझ्या पक्षाबरोबर आम्ही ठामपणे उभे आहोत. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा, आमच्यावर संकट येतात म्हणून भाजपसोबत सूत जुळवण्याचा आमच्या मनात विचार येत नाही, असा टोलाही राऊत यांनी अजितदादांना लगावला.
    थुंकल्याबद्दल मी कुणाचीही माफी मागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या देशातील १३० कोटी लोकांना माफी मागावी लागेल. रोज ते कुठे ना कुठे थुंकत असतात. मी राजकीय लोकांचे नाव घेतल्यावर थुंकलो नाही, बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो. ज्यांनी महाराष्ट्र, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी बेईमानी केली. त्यांचं नाव ऐकल्यावर माझी जीभ चावली गेली. त्यातून थुंकले गेले. यांना जीवशास्त्र, रसायनशास्त्र काही कळतं का? मानसशास्त्र कळते का? माझ्या इतके चांगले संतुलन कुणाचेच नाही. माझ्यामुळे इतरांचे संतुलन बिघडले आहे. हे त्यांनी मान्य करावे, असेही ते म्हणाले.