गुजरात, हरियाणा व आंध्रप्रदेशने मुला-मुलींच्या गटात मारली बाजी; उद्यापासून बाद फेरीला सुरुवात

मुलांच्या दिल्ली विरुध्द राजस्थान, ओरिसा विरुध्द गुजरात, कर्नाटक विरुध्द गुजरात तर मुलींच्या हरियाणा विरुद्ध राजस्थान, मध्यप्रदेश विरुद्ध बिहार, आंध्रप्रदेश विरुद्ध तामिळनाडू या संघात शेवटच्या सेटपर्यंत निकराची झुंज होऊन मुलांच्या दिल्ली, ओरिसा, गुजरात, मुलींच्या हरियाणा, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या संघांनी प्रतिस्पर्धी संघांना पराभूत केले आहे.

    इस्लामपूर : मुलांच्या दिल्ली विरुध्द राजस्थान, ओरिसा विरुध्द गुजरात, कर्नाटक विरुध्द गुजरात तर मुलींच्या हरियाणा विरुद्ध राजस्थान, मध्यप्रदेश विरुद्ध बिहार, आंध्रप्रदेश विरुद्ध तामिळनाडू या संघात शेवटच्या सेटपर्यंत निकराची झुंज होऊन मुलांच्या दिल्ली, ओरिसा, गुजरात, मुलींच्या हरियाणा, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या संघांनी प्रतिस्पर्धी संघांना पराभूत केले आहे. दरम्यान, शनिवारपासून बाद फेरीत सामने होणार असल्याने स्पर्धेची रंगत अधिकच वाढणार आहे.

    मुलांच्या पंजाब व हरियाणा, ओरिसा व पाँडिचेरी, उत्तरप्रदेश व कर्नाटक, झारखंड व तेलंगणा या संघातही जोरदार लढत होऊन पंजाब, ओरिसा, उत्तरप्रदेश व झारखंडने ३-१ सेटनी विजय मिळविला आहे. तसेच बिहारने झारखंड व मध्यप्रदेशला,दिल्लीने मध्यप्रदेशला, केरळने जम्मू , तामिळनाडूने चंदीगडला,हिमाचल प्रदेशने पश्चिम बंगालला सरळ ३ सेटनी हरविले.

    मुलींच्या हरियाणाने बिहारला, केरळने चंदीगड व कर्नाटकला,पश्चिम बंगालने झारखंडला, आंध्र प्रदेशने तेलंगणाला, गुजरात ने तामिळनाडूला, चंदीगडने उत्तर प्रदेशला सरळ ३ सेटनी मात दिली आहे. पहिले ३ दिवस मुलांच्या व मुलींच्या ४ गटात साखळी पद्धतीने सामने पार पडले आहेत. आता आजपासून तुल्यबळ संघांच्यामध्ये बाद फेरीचे सामने होणार आहेत.

    सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी स्पर्धेस भेट दिली. उद्योगपती सुरेंद्र पाटील, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, प्रांताधिकारी डॉ. संपतराव खिलारी, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, प्रा.शामराव पाटील, आर. डी.सावंत, पै.भगवान पाटील, दादासो पाटील यांच्यासह हजारो क्रीडा रसिकांनी खेळाचा मनमुराद आनंद लुटला.

    इस्लामपूरला व्हॉलीबॉल खेळाचा समृध्द वारसा

    इस्लामपूरच्या श्रावणी प्रताप पाटील, सुप्रिया जालिंदर साळुंखे या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघातून खेळत आहेत. महंमद साब मुल्ला,स्व.सत्तारभाई खाटीक यांनी भारतीय संघातून तर स्व.मधुकर पाटील, स्व.शिवाजी भोसले,स्व.संभाजी भोसले, कादर वाठारकर, बकस खाटीक यांच्यासह अनेक खेळाडूंनी राज्याच्या संघातून प्रतिनिधित्व केले आहे. एक काळ होता, देशाच्या संघात निम्मे खेळाडू या शहरातील होते. या शहराने यापूर्वी पाच वेळा राज्य अजिंक्य पद व निवड चाचणी स्पर्धा यशस्वीपणे घेतल्या आहेत. स्व.सुधीर पिसे यांनी राज्य संघटनेचे अध्यक्षपद भूषविले आहे. इस्लामपूर हे शहर व्हॉलीबॉल पंढरी म्हणून ओळखले जाते.

    देशातील सर्वोत्कृष्ठ आयोजन

    या स्पर्धेत देशाच्या विविध २२ राज्यातील मुले व मुलींचे संघ, तसेच राज्य व राज्या बाहेरील पंच, प्रशिक्षक, देश व राज्याच्या संघटनेचे पदाधिकारी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या सर्वांनी प्रतिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे देशात सर्वोत्तम नियोजन केल्याची भावना व्यक्त करीत आहेत. क्रीडा रसिकांच्या उदंड प्रतिसादाबद्दलही समाधान व्यक्त केले जात आहे.