गुलाबराव पाटील आज जळगावात; तब्बल ६० किलोमीटरची स्वागतयात्रा

    जळगाव : सलग तिसर्‍यांदा मंत्रीपदाची तर दुसर्‍यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच दाखल होणारे गुलाबराव पाटील यांचे अभूतपुर्व स्वागत करण्याचे नियोजन त्यांच्या समर्थकांतर्फे करण्यात आले आहे. मुंबईहून रस्ता मार्गाने अमळनेर तालुक्यातील चोपडी कोंडव्हाय फाटा येथून त्यांच्या ताफ्याची एंट्री झाल्यानंतर तेथून अमळनेर, लोणेभोणे फाटा, धरणगाव, पिंप्री, मुसळी, एकलग्न ते पाळधी अशी तब्बल ६० किमीची स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. यात सुमारे २५०-३०० चारचाकी वाहनांचा त्यांच्या समर्थकांचा ताफा सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात कोणत्याही नेत्याने झाले नसेल अशा स्वागताची जय्यत तयारी ही सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कट्टर समर्थकांमार्फत सुरू आहे.

    ४ दिवसांपूर्वी  गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा जिल्ह्यात येत आहेत. ते मुंबईतल्या शासकीय निवासस्थानावरून सकाळी सात वाजता निघणार असून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील चोपडी कोंढव्हाय फाटा येथे ते जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. येथे पहिल्यांदा त्यांचे जंगी स्वागत करण्यात येईल. यानंतर मंगरूळ एमआयडीसीतील कोल्ड स्टोअरेज येथे त्यांचा सत्कार होणार आहे. यानंतर जुन्या शासकीय भवनाजवळ असलेल्या राजभवनाजवळ त्यांचा माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्यातर्फे सत्कार होणार आहे. तर दुपारी साडेतीनच्या सुमारास अमळनेर शहरातील झेंडा चौक येथे गुलाबराव पाटील समर्थकांमार्फत त्यांचे भव्य स्वागत होणार आहे. या सोबत तिरंगा चौक आणि चोपडा नाका पैलाड येथेही त्यांचे स्वागत होणार आहे.

    यानंतर त्यांचा ताफा धरणगाव तालुक्यात दाखल होईल. येथे पहिल्यांदा लोणे-भोणे फाटा येथे चार वाजता त्यांचे स्वागत व सत्कार होईल. साडेचारच्या सुमारास गुलाबराव पाटील हे धरणगाव शहरात दाखल होतील. येथे शहरात प्रवेश करतांना त्यांची सवाद्य भव्य स्वागतयात्रा काढण्यात येईल. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांला वदना करण्यात येईल. येथे स्थानिक पदाधिकार्‍यांतर्फे त्यांचा जंगी सत्कार करण्यात येणार आहे.

    सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जिनींग व्यावसायिकदारांतर्फे त्यांचे स्वागत होणार आहे. तसेच नंतर पिंप्री, चिंचपुरा, मुसळी, एकलग्न येथील स्वागत समारंभ आटोपल्यानंतर गुलाबराव पाटील यांचा ताफा सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास पाळधी येथे येईल. येथे आगमन झाल्यानंतर पाळधी येथिल बाजारपेठ, गांधी चौक येथे आभार प्रदर्शनाने स्वागतयात्रेची सांगता होणार आहे.

    गुलाबराव पाटील यांनी लागोपाठ तिसर्‍यांदा मंत्रीपदाची शपथ घेतल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे त्यांचे अतिशय अभूतपुर्व असे स्वागत करण्यासाठी पदाधिकार्‍यांनी जंगी नियोजन केले आहे. यात गुलाबराव पाटील यांच्या ताफ्यासोबत तब्बल तीनशे चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे. तर धरणगाव शहरात याला दुचाकी रॅलीची देखील जोड मिळणार आहे. ठिकठिकाणी सवाद्य मिरवणूक व फटाक्यांच्या आतषबाजीत गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यामुळे आज गुलाबराव पाटील यांचे स्वागत हे अतिशय अभूतपुर्व असे होणार असून जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.

    दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या जंगी स्वागतासाठी अमळनेर, धरणगाव आणि जळगाव तालुक्यातील पदाधिकार्‍यांची फळी जोमाने कामाला लागली आहे. या भव्य सोहळ्याचे नियोजन सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थकांमार्फत सुरू आहे.