सोलापुरात पावणेदोन कोटीचा गुटखा जप्त! दोन आरोपी अटकेत

सुमारे एक कोटी ४५ लाख ७४ हजार रुपये किमतीचा गुटखा आणि ४५ लाखाचे दोन कंटेनर पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे.

    सोलापूर : कर्नाटकातून बेकायदेशीर रित्या गुटखा पुण्याकडे जात असताना उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे पकडण्यात आला. तालुका पोलिसांनी केलेल्या या कारवाईत कंटेनरसह पावणेदोन कोटीचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोंडीराम पवार आणि इस्माईल शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    कर्नाटकातील गुलबर्गा येथून गुटख्याचा कंटेनर तुळजापूरच्या दिशेने जात असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून मंद्रुपकडून येणाऱ्या दोन्ही कंटेनरचा पाठलाग करण्यात आला. तपासणी दरम्यान, दोन्ही कंटेनर यांना कोंडी येथील पाकणीजवळ थांबविण्यात आले. कंटेनरमधील चालकाकडे विचारणा केली असता, दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

    दोन इसमाचा संशय आल्याने सदर कंटेनरची पोलिसांनी केली पाहणी

    आतमध्ये पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये गुटखासदृश माल भरलेला असल्याचे दिसून आले. दोन्ही कंटेनर सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे नेऊन पाहणी केली असता, त्यात गुटखा, सुगंधी तंबाखूची ८०० पोती आढळून आली. एक कोटी ४५ लाख ७४ हजार रुपये किमतीचा गुटखा आणि ४५ लाखाचे दोन कंटेनर पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे.