दुकान फोडणाऱ्या चोरट्याला हडपसर पोलिसांनी रंगेहात पकडले; चोरट्यांमध्ये अन् पोलिसांत पाठलागाचा थरार

घरफोडी अन् चोरीच्या घटना वाढत असताना हडपसर पोलिसांनी (Police) कपड्याचे दुकान फोडून पोबारा करणाऱ्या चोरट्याला पाठलाग करून पकडले. मध्यरात्री हा थरार घडला. दोन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

  पुणे : शहरात (City) घरफोडी अन् चोरीच्या घटना वाढत असताना हडपसर पोलिसांनी (Police) कपड्याचे दुकान फोडून पोबारा करणाऱ्या चोरट्याला पाठलाग करून पकडले. मध्यरात्री हा थरार घडला. दोन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. पण मुद्देमाल घेऊन पळणाऱ्यास पोलिसांनी पकडले.

  गणेश गौतम कोरडे (वय २२, रा. १५ नंबर चौक, हडपसर) असे पकडलेल्याचे नाव आहे. तर साथीदार साहिल कचरावत (रा. सातवनगर, हडपसर) आणि त्यांच्या अन्य एका साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्र गस्तीवर असलेले मार्शल शेख आणि दांडगे यांनी ही कामगिरी केली.

  चोरट्यांना कसे घेतले ताब्यात? 

  हडपसरमधील मंत्री मार्केट परिसरात अविष्कार नावाच्या इमारतीत मेन मुमेंट नावाचे कपड्याचे दुकान आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला हडपसर येथील मंत्री मार्केट परिसरात काही तरी संशयीत हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली. ही माहिती हडपसर पोलिसांनी दिली. हडपसर पोलीस ठाण्याचे बिट मार्शल रशीद शेख आणि लखन दांडगे यांनी मंत्री मार्केटकडे धाव घेतली.

  चोरटे पळून जाण्याच्या तयारीत होते

  यावेळी गणेश कोरडे आणि त्याचे दोन साथीदार दुकान फोडून त्यातील कपडे चोरी करून दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांच्या दुचाकीला दुचाकी आडवी लावली. गडबडीत दुचाकीवरील कन्ट्रोल सुटुन तिघे खाली पडले. त्यांनी पोत्यात भरलेले कपडेही रस्त्यावर पडले. दोघांनी घटनास्थळावरून धुम ठोकली तर गणेश हाती लागला. त्याला पोलिस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्याने त्यांच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. तसेच त्याचा फरार झालेला साथीदार साहिल कचरावत याच्यावरही यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.