दुचाकी, मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला बेड्या; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

पुणे शहरातील विविध भागांतून दुचाकी आणि मोबाईल चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल १२ मोबाईल आणि ८ दुचाकी जप्त केल्या आहेत.

    पुणे : पुणे शहरातील विविध भागांतून दुचाकी आणि मोबाईल चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल १२ मोबाईल आणि ८ दुचाकी जप्त केल्या आहेत.

    याप्रकरणी १६ ‌वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. अल्पवयीन मुलगा सराईत गुन्हेगार आहे. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अवधूत जमदाडे, आशिष गायकवाड, सचिन सरपाले, राहुल तांबे, विक्रम सावंत व त्यांच्या पथकाने केली.

    शहरात वाहन चोरीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. घरफोडी व इतर लुटमारीला लगाम लावण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु, वाहन चोरीच्या घटना वाढतच असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना या चोरट्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देत हद्दीत गस्त घालण्याबाबत सांगण्यात आले आहे.

    भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अवधूत जमदाडे, आशिष गायकवाड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा एका रेकॉर्डवरील अल्पवयीन मुलाने केला आहे. त्यानुसार, पथकाने त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी त्याला कात्रज कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर येथून ताब्यात घेतले. गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने विविध भागांतून चाेरी केलेल्या ८ दुचाकी आणि १२ मोबाईल जप्त करण्यात आले.

    दरम्यान, हा मुलगा अनाथ आहे. त्याला आई-वडिल किंवा कोणी नातेवाईक देखील नाहीत. तो अधून-मधून धर्मादाय संस्थेत व मिळेल तिथे राहतो. यापूर्वी त्याला गुन्हे शाखेने पकडून ८ गुन्हे उघड केले होते. तर, एका घरफोडीच्या गुन्ह्यात २२ तोळे सोने जप्त केले होते.