सलूनमध्ये केस कापताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत चिखली परिसरातील सलूनमध्ये हेअर कट करण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने या मुलीला हेअर कट करण्यासाठी खुर्चीत बसवले....

    पिंपरी, चिंचवडमध्ये एका अल्पवयीन मुलीचे केस कापताना केशकर्तनकाराने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करीत विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.  या प्रकरणी केशकर्तनकाराला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहम्मद शेबु मोहम्मद हानिफ सलमानी असं आरोपीचे नाव असून तो ‘थ्री स्टार’ नावाच्या सलूनमध्ये काम करत होता.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत चिखली परिसरातील सलूनमध्ये हेअर कट करण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने या मुलीला हेअर कट करण्यासाठी खुर्चीत बसवले. हेअर कट करत असताना आरोपीने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत अश्लील कृत्य केल्याचं पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

    हेअर कट झाल्यानंतर मुलगी आजीसोबत घरी आली, तेव्हा तिने घडलेला प्रकार आई आणि आजीला सांगितला. पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाणे गाठत केशकर्तनकाराविरोधात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत अशी माहिती पोलीस अधिकारी वसंत बाबर यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डी. एस. मुंडकर करत आहेत.