हुंड्यासाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ; पती अत्याचार करायचा तर सासरा…

एका बेरोजगार तरुणाने व्यावसायिक असल्याची बतावणी करून सुशिक्षित तरुणीची व तिच्या कुटुंबीयांची फसवणूक केली. त्यानंतर या तरूणीशी लग्न केले. लग्नानंतर तो तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. सासू-सासरेही माहेरून 50 हजार रुपये आणण्यासाठी सतत त्रास देत होते.

  नागपूर : एका बेरोजगार तरुणाने व्यावसायिक असल्याची बतावणी करून सुशिक्षित तरुणीची व तिच्या कुटुंबीयांची फसवणूक केली. त्यानंतर या तरूणीशी लग्न केले. लग्नानंतर तो तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. सासू-सासरेही माहेरून 50 हजार रुपये आणण्यासाठी सतत त्रास देत होते.

  लग्नाच्या 70 दिवसांतच पती व सासू-सासऱ्याकडून होत असलेल्या छळाला कंटाळून पीडितेने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पीडित रेशमी (वय 23) च्या तक्रारीवरून पती नीरज वाघमारे (वय 26), सासरा शिवराजसिंग वाघमारे (वय 60), सासू माधुरी वाघमारे (वय 55, रा. काटोल रोड) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

  नीरज आणि रेशमी यांचे 30 जानेवारीला थाटात लग्न झाले. पीडित नवविवाहिता रेशमीचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. रेशमीला मागणी घालण्यासाठी आलेल्या निरजने व्यवसाय करत असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडितेच्या कुटुंबीयांनी 30 जानेवारीला थाटात लग्न करुन दिले.

  लग्नानंतर मात्र, नीरज कुठलाच कामधंदा करत नसल्याचे उघड झाले. पीडितेने जाब विचारला असता तो तिला शारीरिक, मानसिक त्रास देऊ लागला. त्याचे आई-वडीलही त्याला साथ देत होते. माहेरून 50 हजार रुपये आणण्यासाठी पीडितेवर दबाव टाकला जात होता. पीडितेने लग्नापूर्वी कमावलेले एक लाख रुपयेही आरोपींनी हिसकावून घेतले होते.

  मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार

  पती क्षुल्लक कारणावरुन शिवीगाळ करत मारहाण करायचा. अनैसर्गिक अत्याचार करायचा. विरोध केल्यास अॅसिड टाकून चेहरा विद्रूप करण्याची तसेच माहेरच्यांना मारण्याची धमकी देत होता. इतकेच नाहीतर सासऱ्याचीही तिच्यावर वाईट नजर होती. संधी मिळताच तो तिच्याशी अश्लील चाळे करत होता. पतीला याबाबत सांगितल्यावर तो गप्प राहायला सांगत होता. आरोपींनी पीडितेच्या स्वातंत्र्यावरही बंधणे घातली होती.