
नुसत्या नोटीसा नको तर पं. स. तालुका आरोग्य अधिकाऱ्यासह तीनही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची ग्रामस्थांची मागणी
उरुळी कांचन : येथील हर्ष जगताप या वीस महिन्याच्या बाळाच्या मृत्युनंतर, उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या गलथान कारभारामुळे मंगळवारी (दि २३) रोजी तब्बल सात तासाहुनही अधिक काळ हर्ष जगताप याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ न शकल्याची धक्कादायक बाब पुढे आली होती. या प्रकरणी दोषी असलेल्या उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.
डॉ. सुचिता कदम, डॉ. संदीप सोनवणे व डॉ. नम्रता नंदे ही त्या नोटीसा बजावलेल्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची नावे आहेत. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वरील तीन वैधकिय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्याऐवजी, वरील तीन अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या हवेली पंचायत समितीच्या आरोग्य अधिकाऱ्यासह, डॉ. सुचिता कदम, डॉ. संदीप सोनवणे व डॉ. नम्रता नंदे या तिघांनाही तात्काळ निलंबित करण्याबरोबरच, वरील चौघांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी उरुळी कांचन ग्रामस्थांनी केली आहे.
तर दुसरीकडे हर्ष जगताप यांच्या मृतदेहाची हेळसांड होण्यास कारणीभुत ठरलेल्या उरुळी कांचन उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांतील डॉ. सुचिता कदम, डॉ. संदीप सोनवणे व डॉ. नम्रता नंदे या तिन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी बरोबरच, वरील तिघांनाही सेवेतुन तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे (पश्चिम महाराष्ट्र) अध्यक्ष विकास जगताप व उरुळी कांचन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अमित कांचन यांनी केली आहे. वरील मागणीसाठी पुढील दोनच दिवसात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेणार असल्याची घोषणा विकास जगताप व अमित कांचन यांनी केली आहे.
उरुळी कांचन येथील एका इमारतीच्या पाण्याची टाकीत बुडुन हर्ष जगताप याचा मंगळवारी (दि. २३) रोजी सायंकाळी मृत्यु झाला होता. हर्षच्या नातेवाईकांनी हर्षला उरुळी कांचन येथील प्राथमिक रुग्णालयात नेले. मात्र त्या ठिकाणी एकही डॉक्टर उपलब्द नसल्याने, हर्षचा मृतदेह तीन तासाहुन अधिक काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पडुन होता. या तीन तासाच्या काळात पत्रकार सुनिल जगताप यांच्यासह अनेकांनी डॉक्टरांना फोन करूनही, तीनपैकी एकाही डॉक्टरांनी फोन न उचलल्याने हर्ष जगताप याच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. विशेष बाब महिण्याला लाखोंचा पगार घेणारे व उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या डॉ. कदम व डॉ. सोनवणे हे दोघांचीही अधिकृत रजा मंजुर नसतांही दोघेही सुट्टीवर गेले होते. तर त्यांनी परस्पर चार्ज दिलेल्या पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. नम्रता नंदे यांनीही, डॉ. कदम व डॉ. सोनवणे या दोघांच्या प्रमानेच बेकायदा दांडी मारल्याचे पुढे आले आहे.
शवविच्छेदन दिरंगाई प्रकरणी जिल्हाधिकारी यांना भेटणार- विकास जगताप.
याबाबत बोलतांना भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे (पश्चिम महाराष्ट्र) अध्यक्ष विकास जगताप म्हणाले, हर्ष जगताप या चिमुकल्या बाबत मंगळवारी सायंकाळी उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेला प्रकार अतिशय निंदणीय आहे. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैधकिय अधिकारी रजा मंजुर नसतांनाही आठ-आठ दिवस गैरहजर राहतात ही बाब अतीशय भयंकर व आरोग्य खात्याला काळीमा फासणारी आहे. उरुळी कांचन येथील दोन्ही वैधकिय अधिकारी बेकायदा सुट्टीवर असतांना, त्यांच्याजागी आलेला डॉक्टरही गैरहजर राहतो ही बाब त्याहूनही अधिक चिंताजनक आहे. यामुळे उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या एकुणच कारभाराची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.