राज्यात उन्हाचा कडाका वाढणार, विदर्भावर अवकाळीचं संकट कायम; जाणून घ्या हवामान अंदाज

राज्यात हळूहळू उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मात्र तरी देखील अद्यापही पावसाचं सावट आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

पुणे : राज्यात हळूहळू उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मात्र तरी देखील अद्यापही पावसाचं सावट आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात वातावरण कोरडे राहणार असून, कमाल तापमानात तीन ते चार अंश सेलल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असून, उकाड्यात वाढ सुरूच आहे. रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी वर्धा ३७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सोलापूर, अकोला, अमरावती येथे कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे होते. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३६ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानातही चढ-उतार होत असून, बहुतांश ठिकाणी पारा १२ अंशांच्या पुढे कायम आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान १० अंश सेल्सिअस तापमानाचा नोंद झाली.

उत्तर प्रदेश पासून, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते तमिळनाडू पर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत. आज (ता. २७) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला.

विदर्भावर पावसाचं सावट

राज्यात पावसामुळे रब्बी पिकाला मोठा फटका बसला आहे. गारपीट आणि पावसामुळे ज्वारी, गहू, हरबारा या पिकांचं तसेच आंबा, केळी, द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात आता पावसाची शक्यता नाही. मात्र विदर्भात तीस मार्चपर्यंत हवामान ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात उन्हाचा तडाका वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमान तीन ते चार अंश सेलल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.