मुश्रीफ यांच्यावरील आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’

मागीलवर्षी कारखाना सुरू करण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी हमी दिल्यानंतर १६ कोटी रुपये भरणे शक्य झाले. परंतु कारखाना अध्यक्षपदावर असताना 'हमारे पास बहुत पैसा है...' असे म्हणणाऱ्या अशोकअण्णा चराटी यांना तीन कोटी रुपये परत मिळतील, याची हमी नसल्याने व या पैशांचा वेळेत भरणा न झाल्याने कारखाना बंद पाडण्याचे पाप चराटी यांनी केले आहे. 

  आजरा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मागीलवर्षी कारखाना सुरू करण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी हमी दिल्यानंतर १६ कोटी रुपये भरणे शक्य झाले. परंतु कारखाना अध्यक्षपदावर असताना ‘हमारे पास बहुत पैसा है…’ असे म्हणणाऱ्या अशोकअण्णा चराटी यांना तीन कोटी रुपये परत मिळतील, याची हमी नसल्याने व या पैशांचा वेळेत भरणा न झाल्याने कारखाना बंद पाडण्याचे पाप चराटी यांनी केले आहे.

  कारखान्याच्या चराटी यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत सुमारे ११२ कोटी रुपये तोटा झाला आहे, असे आर्थिक पत्रकातून स्पष्ट होते. कारखान्यावरील कर्जाचे खापर जर चराटी विरोधकांवर फोडत असतील तर कारखाना संचालक मंडळाच्या बुधवारी होणाऱ्या सभेमध्ये पत्रकार, संबंधित अधिकारी यांच्यासमोर याचा खुलासा करावा व आपले म्हणणे मांडावे. यावर खुली चर्चा करण्यास आपण केव्हाही तयार आहोत, असे आव्हान कारखान्याचे मुश्रीफ समर्थक संचालक वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर, अंजना रेडेकर, एम.के. देसाई, सुधिर देसाई यांनी पत्रकार बैठकीद्वारे केले आहे. चराटी यांनी मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सदर बैठक पार पडली.

  चराटी यांच्या कारभाराबाबत साखर संचालकांसह ठिकठिकाणी वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. परंतु, चराटी यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्व तक्रारी बाजूला करण्यात यश मिळवले.

  तीन अपत्य असणारे संचालकही संचालक मंडळात राहिले. परंतु, याबाबत आम्ही कधीही हरकत घेतली नाही. मुश्रीफ यांच्यावर टीका करणारे चराटी हे जिल्हा बँक व कारखाना संचालकपदी मुश्रीफ यांच्या आशीर्वादानेच गेले होते. याचा विसर त्यांना पडत आहे. जोपर्यंत आजरा सुतगिरणी अडचणीत होती तोपर्यंत जिल्हा बँकेकडून आवश्यक ती मदत मुश्रीफ यांच्यामार्फत चराटी यांनी घेतली व त्यांचे गोडवे गायले. कालांतराने मुश्रीफ यांच्यावर तेच टीका करू लागले.

  वास्तविक, चराटी यांना मुश्रीफ यांच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. चराटी यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीतील तोट्याचा आलेख चढता असतानाही कारखान्याचा चेअरमन कोण याचा विचार न करता मुश्रीफ यांनी मदतीचा हात पुढे केला. ज्या-ज्यावेळी कारखान्याने जिल्हा बँकेकडून कर्ज मिळवले त्या-त्या वेळी चराटी यांनी स्वतःच्या संस्थांचे पैसे प्रथम काढून घेतले.

  मुश्रीफ यांच्या सहकार्यातून व त्यागातून आजरा साखर कारखाना सुरु आहे याचा सोयीस्कर विसर चराटी यांना पडू लागला आहे.

  आजरा साखर कारखान्यातील अडचणींचा संदर्भ जिल्हा बँक व इतर निवडणुकांशी जोडू नये. जिल्हा बँकेमध्ये तुमच्या कर्तुत्वाने तुम्हाला अपयश आले आहे. ज्यांनी कारखाना चालवण्यासाठी मदत केली. त्यांच्याबाबत बोलताना भान ठेवावे, असा इशाराही या संचालकांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिला.