प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी ऑनलाईन प्रणाली सुरू, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही – हसन मुश्रीफ

नियुक्त अभ्यासगटाने मागील बदली प्रक्रियेत असलेल्या सर्व त्रुटी दूर करून सर्वसमावेशक अशी ऑनलाईन आज्ञावली विकसित केली आहे. पूर्वी शिक्षकांची बदली करताना विविध समस्या निर्माण होत होत्या. आता ऑनलाईन प्रक्रियेमुळे बदली प्रक्रियाच पारदर्शक होईल. त्याचप्रमाणे आता यापुढे शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन न होता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

    मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत होणाऱ्या जिल्हा परिषदे अंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. मात्र आता या ऑनलाईन संगणकीय प्रणालीमुळे शिक्षकांच्या बदल्याना गती मिळेल. राज्यात आजमितीस जवळपास 2 लाख प्राथमिक शिक्षक असून या प्रणालीमुळे कोणत्याही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार नाही, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केले.

    दरम्यान, मंत्री मुश्रीफ म्हणाले की, नियुक्त अभ्यासगटाने मागील बदली प्रक्रियेत असलेल्या सर्व त्रुटी दूर करून सर्वसमावेशक अशी ऑनलाईन आज्ञावली विकसित केली आहे. पूर्वी शिक्षकांची बदली करताना विविध समस्या निर्माण होत होत्या. आता ऑनलाईन प्रक्रियेमुळे बदली प्रक्रियाच पारदर्शक होईल. त्याचप्रमाणे आता यापुढे शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन न होता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अपर मुख्य सचिव राजेशकुमार म्हणाले की, या ऑनलाईन प्रणालीद्वारे बदली प्रक्रिया अतिशय सोपी व पारदर्शक झाली आहे. गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशासाठी शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतात, त्या आता या संगणकीय प्रणालीमुळे पूर्ण होणार आहे. या संगणकीय प्रणालीत चुकीची माहिती भरल्यास ती अन्य शिक्षकांना पाहता येईल, अशी सुविधा देण्यात आली आहे. ही प्रणाली देशातील कोणत्याही राज्यात नसून या आज्ञावलीला अन्य राज्यातून मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

    जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदलीच्या प्रचलित संगणकीय प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली होती. या अभ्यासगटाने राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी विभागवार भेटी व चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्यक्ष बदल्या करतांना त्यांना बदल्यांसंदर्भात येणाऱ्या अनुभवांचा तौलनिक अभ्यास करून या अभ्यासगटाने आपला अहवाल शासनाला सादर केला.

    जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून सन 2022 मधील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या प्रणालीचे अनावरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव का.गो.वळवी, पुणे जिल्हा परिषद सीईओ तथा समिती अध्यक्ष आयुष प्रसाद, सातारा जिल्हा परिषद सीईओ विनय गौडा, पुणे स्मार्ट सीटीचे सीईओ संजय कोलते, जिल्हा परिषद सीईओ वर्धा सचिन ओंबासे, मुंबई मनपा सहआयुक्त अजित कुंभार, एमएमआरडीए सहआयुक्त राहुल कर्डीले, त्याचप्रमाणे आज्ञावली विकसित करणारे विन्सीस आयटी सव्हिसेस आणि साय-फ्युचर इंडिया प्रा.लि.चे पदाधिकारी आदी उपस्थित होते.