कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा

कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरात रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्याविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली. या विरोधात फेरीवाल्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.

    कल्याण-डोंबिवली : फेरीवाल्यांवरील अन्यायकारक कारवाई थांबवावी, राष्ट्रीय फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी, या कायद्याची अंमलबजावणी करण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत शेकडो फेरीवाल्यांनी आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयाचे दार ठोठावणार असल्याचा इशारा महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी दिला.

    कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरात रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्याविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली. या विरोधात फेरीवाल्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधी पुनर्वसन करा अशी मागणी फेरीवाला संघटनांनी केली. आज फेरीवाल्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाच्या नेतृत्वाखाली शेकडो फेरीवाल्यांनी केडीएमसी मुख्यालय गाठले. केडीएमसी मुख्यालयाचे प्रवेशद्वारावर शेकडो फेरीवाल्यांनी ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलनात फेरीवाल्याने महापालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

    यावेळी बोलताना महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट यांनी राष्ट्रीय फेरीवाला कायद्याचे परिणामकारक अंमलबजावणी करावी, महापालिकेने स्वतंत्र फेरीवाला विभाग सुरू करावा, फेरीवाल्यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्या फेरीवाल्यांना परवाना द्यावा, राष्ट्रीय शहर फेरीवाला समिती एकत्रित करून प्रत्येक व्यवसायधारकांना विमा, पेन्शन, मुलांना शालेय शिक्षणात सूट सारख्या सुविधा द्याव्यात. कल्याण शहरातील फेरीवाला व पथव्यवसायिक धारकांना जरी मरी नाल्यावर स्लॅब बांधून जागा द्यावी त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, फेरीवाल्यांवर कारवाईच्या नावाने मालमत्तेचे नुकसान करणे थांबवा अशा मागण्या करण्यात आल्याचे सांगितले.