शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यात अडविणारा ‘तो’ अखेर जेरबंद

पुरंदर तालुक्यातील सासवड पोलिस स्टेशन निर्भया पथकाने एका तोतया पोलिस शिपायाचा पर्दाफाश केला आहे. मी पोलिस आहे असे सांगून पोलिसासारखा खाकी ड्रेस घालुन कॉलेजमधील मुलामुलींना अडवून त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी करायचा.

    सासवड : पुरंदर तालुक्यातील सासवड पोलिस स्टेशन निर्भया पथकाने एका तोतया पोलिस शिपायाचा पर्दाफाश केला आहे. मी पोलिस आहे असे सांगून पोलिसासारखा खाकी ड्रेस घालुन कॉलेजमधील मुलामुलींना अडवून त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी करायचा. शाळेतील मुलांना ड्रेस घातला नाही, म्हणून उठाबशा काढायला लावायचा, मुलांना पोलिस काठीने मारहाण करायचा, अशा प्रकारच्या तक्रारी सासवड पोलिस स्टेशनला मिळाल्या होत्या.

    त्या तक्ररींच्या अनुषंगाने निर्भया पथकाची गाडी क्र. एमएच. १२ जेसी ३३२४ पेट्रोलिंग करत असताना वाघीरे कॉलेजजवळ काही मुलांनी गाडी थांबवुन मोटारसायकलवरील मुलगा दाखवला व हाच ड्रेस घालुन आम्हाला त्रास देतो असे सांगीतले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व पोलिस स्टेशनला घेऊन गेले. त्यास पोलिसांनी विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पण नंतर त्याने मुलांना त्रास दिल्याची कबुली दिली.

    सदर मुलगा हा पुरंदर तालुक्यातील गुऱ्होळी या गावातील असुन निलेश दशरथ भंडलकर असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे होमगार्डचे काम असल्याची सनदही नाही. पण त्याच्या मोबाईल मध्ये होमगार्डच्या ड्रेस वर काढलेले फोटोही सापडले असून, अशा प्रकारच्या जर काही तक्रारी असतील तर त्यांनी सासवड पोलिस स्टेशन निर्भया पथकाशी संपर्क करावा. असे आवाहन सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यानी केले आहे. तर पुढील तपास भोर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, सासवड पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. निलेश जाधव करीत आहेत.