
परदेशातली परिस्थिती आणि देशातली, राज्यातली परिस्थिती लक्षात घेऊन मास्कमुक्तीचं (Mask Free Maharashtra) काय होणार, यावर राजेश टोपे यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई: सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या निर्बंधांविषयी राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सर्व नियम पाळून आणि काळजी घेऊन सण साजरे करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचं सांगितलं आहे. परदेशातली परिस्थिती आणि देशातली, राज्यातली परिस्थिती लक्षात घेऊन मास्कमुक्तीचं (Mask Free Maharashtra) काय होणार, यावरही राजेश टोपे यांनी भाष्य केलं आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले,“मास्कमुक्ती करण्याचं धारिष्ट्य सध्या करणार नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा. परदेशातली परिस्थिती पाहता मास्क वापरणं गरजेचं आहे. नागरिकांनी लस घ्यावी म्हणून निर्बंध लावण्यात आले होते. पण आता एक मास्कचा नियम सोडला तर आपण बऱ्यापैकी नियमांचं शिथिलीकरण केलेलं आहे. सार्वजनिक वाहतुकीला गर्दी दिसून येते”.
परदेशातली चौथी लाट आणि कोरोना परिस्थितीबद्दल बोलताना टोपे म्हणाले,“काही महत्त्वाच्या देशात चौथी लाट पाहायला मिळत असतानाही आपण निर्बंध लादलेले नाहीत, किंबहुना विमानप्रवासावरही निर्बंध नाहीत. त्यामुळे ज्या जुजबी गोष्टी राहिल्या आहेत जसं की लसीकरण, तर ते करून घ्यावं. या चांगल्या उदात्त हेतूने आत्ता जे काही जुजबी निर्बंध आहेत ते आहेत. या संदर्भात थोडा धीर धरण्याची आवश्यकता आहे. देशाचं जगाचं चित्र लक्षात घेऊन, देशाकडून आलेल्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेता येईल”.