रूग्णवाहिका कंत्राटी चालकांना आरोग्य मंत्र्यांचा दिलासा

राज्याच्या कानाकोपऱ्यात रूग्णवाहिकेवरील कंत्राटी चालक कार्यरत आहेत. कोरोना काळात या चालकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे त्यांचे वेतन वितरित करण्यास उशीर होऊ नये. अशा दिरंगाईची सविस्तर चौकशी करावी. तसेच यापुढे कंत्राटदाराच्या माध्यमातून वेतन न देता थेट चालकाच्या खात्यावर वेतन जमा करण्याच्या सूचना मंत्री सावंत यांनी दिल्या.

  मुंबई : आरोग्य विभागातील (Health Department) रूग्णवाहिकेवरील (Ambulance) चालक कंत्राटी (Contract Driver) पद्धतीने भरण्यात आले आहेत. या चालकांची कंत्राटदार फसवणूक (Fraud By Contractor) करत असून त्यांचे पगार वेळेत देत नाहीत. या कंत्राटी चालकांचे पगार थकविणाऱ्या कंत्राटदाराने थकवलेले पैसे तात्काळ चालकांच्या खात्यावर जमा करावे; अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिला.

  आरोग्य विभागातील रूग्णवाहिकेवरील कंत्राटी चालकांच्या प्रश्नांबाबत आरोग्यमंत्री सावंत यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीस खासदार डॉ. अनिल बोंडे, आयुक्त डॉ. रामास्वामी आणि कंत्राटी चालकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  राज्याच्या कानाकोपऱ्यात रूग्णवाहिकेवरील कंत्राटी चालक कार्यरत आहेत. कोरोना काळात या चालकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे त्यांचे वेतन वितरित करण्यास उशीर होऊ नये. अशा दिरंगाईची सविस्तर चौकशी करावी. तसेच यापुढे कंत्राटदाराच्या माध्यमातून वेतन न देता थेट चालकाच्या खात्यावर वेतन जमा करण्याच्या सूचना मंत्री सावंत यांनी दिल्या.

  आरोग्य विभागाला जी देयके प्राप्त होतात त्यामध्ये कंत्राटी चालकांचे वेतन वेळेत जमा केले आहे की नाही याची खात्री करूनच देयके मंजूर करण्यात यावीत. जे कंत्राटदार चालकांचे वेतन अदा न करता देयके पाठवतील त्या संबंधित कंत्राटदाराविरूद्ध कडक कारवाई करण्याचे आदेशही मंत्री सावंत यांनी या बैठकीत दिले.

  विविध योजना उपक्रम कालबध्द पध्दतीने राबवा
  सर्वसामान्यांचा आरोग्य विभागाशी दैनंदिन संपर्क येतो. त्यामुळे आरोग्य विभागाच्या विविध योजना आणि उपक्रम कालबध्द पध्दतीने राबविण्यात यावेत, अशा सूचना मंत्री सावंत यांनी आरोग्य भवन येथे घेतलेल्या बैठकीत दिल्या. आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य सेवा, मातृत्व वंदन योजना, विविध लसीकरण मोहीमेचा आढावा त्यांनी घेतला.

  मधुमेह आणि कर्करोगाबाबत जनजागृती करा
  आरोग्य विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी करताना सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवावे. या विभागाकडून दिल्या जाणाऱ्या विविध प्रमाणपत्राबाबत देखील सुटसुटीत कार्यप्रणाली अवलंबिली जावी असे निर्देश देतानाच मधुमेह आणि कर्करोगाबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.