
डॉक्टर गायत्री देशपांडे आणि प्रसूती तसेच स्त्री रोग विभागाची सहाय्यक चिकित्सा अधिकारी जान्हवी लालचंदानी यांनी सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारा 2023 या 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये एकूण 5034 महिलांची तपासणी केली.
मुंबई: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नुकतंच मुंबईत एक सर्वेक्षण (Mumbai Health Survey) करण्यात आलं. या सर्वेक्षणाचा अहवाल मुंबईतील महिलांसाठी (Women Survey) धोक्याचा इशारा देणार आहे. या आरोग्यविषयक सर्वेक्षणानुसार मुंबईतील 63 टक्के महिलांची हाडं कमकुवत आहेत. साधारणपणे चाळीशीच्या पुढच्या महिलांना हाडांची समस्या जाणवत आहे. या महिलांना ऑस्टियोपेनियाची (Osteopenia) समस्या जाणवत आहे. हाडं कमकुवत असल्याने या महिलांना फ्रॅक्चर, अपंगत्वाचा धोका तर आहेच पण यामुळे मृत्यू ओढवण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
महिलांचं अज्ञान
नानावटी मॅक्स हॉस्पिटलच्या या रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला की, महिलांना आपल्या समस्येविषयीची माहिती नाही. ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता, रजोनिवृत्ती, मधुमेह किंवा किडनीचे आजार, शारिरीक व्यायामाचा अभाव, निष्क्रिय जीवनशैली आणि वाढतं वय ही ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis) आणि ऑस्टियोपीनियाची (Osteopenia) प्रमुख कारणं आहेत.
डॉक्टर गायत्री देशपांडे आणि प्रसूती तसेच स्त्री रोग विभागाची सहाय्यक चिकित्सा अधिकारी जान्हवी लालचंदानी यांनी सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारी 2023 या 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये एकूण 5034 महिलांची तपासणी केली. यात ऑस्टियोपोरोसिस किंवा ऑस्टियोपेनिया झालेल्या रुग्णांचा समावेश नव्हता. कॅन्सर किंवा फ्रॅक्चरवरील उपचार केलेल्या 40 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांविषयी या सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला.
5पैकी 3 महिला ऑस्टियोपेनियाग्रस्त
या अभ्यासात 40 ते 95 या वयोगटातील एकूण 1921 महिलांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं. हाडांची घनता मोजणाऱ्या ड्युएल एनर्जी एक्स-रे एब्जॉर्पियोमेट्री (DEXA) स्कॅनद्वारे या महिलांची तपासणी करण्यात आली. या स्क्रिनिंगमधून समजलं की, मुंबईतील 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या दर 5 पैकी 3 महिलांना ऑस्टियोपेनिया आहे. तर दुसरीकडे दर पाचपैकी एका महिलेला ऑस्टियोपोरोसिस असल्याचं निदान करण्यात आलं. त्यामुळे हाडं फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. या महिलांना कुबड येण्याची शक्यता असल्याने श्वसन प्रक्रियेवर परिणाम होतो. हाडांच्या आरोग्यासाठी कायम चेक- अप करत राहणं आवश्यक आहे.
डॉ. गायत्री देशपांडे यांनी सांगितलं की, या सर्वेक्षणामुळे भविष्यात ही परिस्थिती सुधारण्यासाठी काम करण्यात मदत होईल. डॉ. दीपक पाटकर म्हणाले की, स्टेरॉइडचा उपयोग किंवा दुरुपयोग, धुम्रपान किंवा दारूच्या सेवनाची जुनी सवय यामुळे हाडं कमकवत होतात. आपल्या लाइफस्टाइलकडे लक्ष देणं आवश्यक आहे.