आमदार अपात्रतेवर उद्या होणार सुनावणी; विधानसभा अध्यक्षांची तयारी पूर्ण; शिंदे, ठाकरेंना नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीसाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) 'ॲक्शन मोड'वर आले आहेत.

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीसाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. सुनावणीची तयारी पूर्ण केली असून, शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाला विधानसभा अध्यक्षांनी २५ सप्टेंबरला उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी ठाकरे व शिंदेंनाही वैयक्तिक नोटीस पाठवली असल्याची माहिती आहे.

    सुप्रीम कोर्टाने एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिलेले होते. तशीही आमची सुनावणी १४ तारखेला झालेली होती आणि पुढील सुनावणी प्रस्तावित होती. त्यामुळे येत्या आठवड्यात आम्ही सुनावणी घेऊन निर्णय घेऊ. गरज पडली तर दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना बोलावण्यात येईल, असे नार्वेकर यांनी सांगितले होते. सध्या हा विषय न्यायप्रविष्ठ आहे. तसेच मीच यावर सुनावणी घेऊन निर्णय देणार असल्याचे ते म्हणाले. दोन्ही गटांना सुनावणीस उपस्थित राहण्यासाठी नोटीसा बजावल्या असल्या तरी सोमवारी अपात्रतेचा अंतिम निर्णय होण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

    अमित शहांची शिंदे-फडणवीसांसोबत बंद दाराआड चर्चा

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मुंबई दौऱ्यात लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला. तेथे त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी सोमवारी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर शाह यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.

    सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करा

    शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्षांना पाठविले आहे. वडट्टेवार म्हणाले की, सुनावणी पारदर्शक करण्यात यावी त्यासाठी लाईव्ह प्रक्षेपण गरजेचे आहे.