राज्यात उष्णतेची लाट पसरणार; मध्य भारताला सर्वाधिक धोका तर महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात…

राज्यातील सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

  मुंबई : यंदा देशामध्ये उष्णतेची लाट येणार असून, त्यापासून मध्य भारताला अधिक धोका आहे. त्यामध्ये मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिसा आदी भागांचा समावेश आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव कसा करावा, यासाठी मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. पावसाचा अंदाज मे महिन्याच्या अखेरीस देण्यात येईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

  ओडिशा, छत्तीसगडमधील उत्तर भागासह आंध्र प्रदेशलाही उष्णतेच्या झळा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. समुद्रकिनारी असलेल्या भागातही उष्णतेचा फटका बसणार असून, एप्रिल महिन्यात देशातील सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. जवळपास 39.2 मिमी पावसाची नोंद होईल. देशात 1 ते 7 एप्रिल दरम्यानचे तापमान सरासरी 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढेल. साधारणतः एप्रिल महिन्यात अंशतः पाऊस असतो. परंतु, यंदा मात्र तसे होणार नाही. राजस्थानशिवाय गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व अन्य काही राज्यांत पावसाची शक्यता आहे.

  पूर्व विदर्भ होरपळणार

  राज्यातील सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

  तापमानात वाढ

  मार्च महिन्यामध्ये सरासरी 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. एक-दोन अंश सेल्सिअस वरखाली झाले. आता एप्रिल महिन्यात यामध्ये दोन ते तीन अंशाने वाढ होईल. त्यामुळे एप्रिल महिन्यातील कमाल तापमान हे 42 अंशापर्यंत जाईल आणि मे महिन्यात साधारणपणे 44 अंशापर्यंत त्याची नोंद होऊ शकते, असेही महापात्रा यांनी सांगितले.