संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

तासगाव तालुक्यातील द्राक्ष शेतीचे गेली दोन दिवस पडणारा पाऊस आणि सतत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्याचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत.

  तासगाव : तासगाव तालुक्यातील द्राक्ष शेतीचे गेली दोन दिवस पडणारा पाऊस आणि सतत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्याचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत.

  कोरोना काळातील संकटापासून द्राक्ष शेतकऱ्यामागे सुरू झालेली संकटाची मालिका याही वर्षी कायम आहे. गेल्या वर्षी अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा या वर्षी अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. अचानक बदललेल्या वातावरणामुळे ५० टक्क्यांहून अधिक द्राक्ष बागांमध्ये डाऊनीचा प्रादुर्भाव झाला आहे. ढगाळ वातावरण आणि पहाटे पडणाऱ्या दवामुळे छाटणी होऊन ३० ते ४५ दिवस झालेल्या द्राक्ष बागांमध्ये फळकुज मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

  दरम्यान त्यातच सोमवार ते बुधवार दररोज तालुक्यात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लाऊन त्यात भर घातली आहे. मनेराजूरी, सावळज हा द्राक्ष टापू आहे याच परिसरात सोमवार, मंगळवार, बुधवार असे तीन दिवस तुफान अवकाळी पावसाने हजेरी लावली. मंगळवार आणि बुधवारी तर तुफान पाऊस पडल्याने ५० टक्के हून अधिक द्राक्षे धोक्यात आली आहेत.

  अनेक छोटे शेतकरी सलग दुसऱ्या वर्षी अडचणीत आले आहेत. महागडी औषधे फवारणी करावी लागत आहेत. आथिर्क अडचणी मुळे बागेत फवारणी करण्यासाठी आथिर्क जुळणी कशी करायची ? याची विवंचना शेतकऱ्यांसमोर पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना किमान दिलासा मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

  भरपाईची मागणी करणार : सुमन पाटील

  तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यासह जिल्ह्यात द्राक्ष शेतकरी अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती आमदार सुमन पाटील यांनी दिली. जिल्हा कृषी विभागानेही आदेशाची वाट न पाहता पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.