नागपूरला अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा; झाडे, विद्युत खांब पडले

गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात (Nagpur)अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नागपूरच्या काही भागात मुसळधार(Heavy rain) तर काही भागात मात्र रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळाली.

    नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात (Nagpur)अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नागपूरच्या काही भागात मुसळधार(Heavy rain) तर काही भागात मात्र रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळाली. नागपूरमध्ये गुरुवारी दिवसभर तापल्यानंतर सायंकाळी जाेराच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने (Hail )नागपूर शहरासह जिल्ह्यातही चांगलेच झाेडपले. शहरात अनेक भागात गारपीटही झाली. वादळामुळे शहरातील अनेक भागात माेठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. झाडे काेसळल्याने तारा तुटून विजेचे पाेलही खाली पडल्याने व विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक वस्त्यात अंधार पसरला हाेता. (Heavy rain and hail lash Nagpur)

    भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
    नागपुरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी साडेसातनंतर शहराला वादळी पावसामुळेच हाहाकार उडाला. अचनाक आलेल्या पावसामुळे संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

    दरम्यान हवामान विभागाने गुरुवारी गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा दिला हाेता. सायंकाळी अचानक वातावरण बदलले आणि विजांसह मेघगर्जना सुरू झाली. जाेराच्या वादळी वाऱ्यासह पावसानेही हजेरी लावली. शहरातील काही भागात गारपीटही झाली. मात्र वादळाने चांगलेच नुकसान केले. लक्ष्मीनगर, देवनगर, बजाजनगर, माटे चाैक, दीक्षाभूमी ते नीरी राेडवरील अनेक माेठी झाडे रस्त्यावर काेसळली.