बारामतीला वादळी पावसाने झोडपले; झाडे उन्मळली, विद्युत पुरवठा खंडीत

बारामती शहर व परिसरात आज सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील ठिकाणची झाडे उन्मळून पडली असून विद्युत पुरवठा व इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. बारामती परिसरातील द्राक्ष बागा व इतर चारा पिकांचेही मोठे नुकसान या वादळी पावसामुळे झाले आहे.

    बारामती / नवराष्ट्र न्युज नेटवर्क : बारामती शहर व परिसरात आज सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील ठिकाणची झाडे उन्मळून पडली असून विद्युत पुरवठा व इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. बारामती परिसरातील द्राक्ष बागा व इतर चारा पिकांचेही मोठे नुकसान या वादळी पावसामुळे झाले आहे.

    आज (दि ११) सायंकाळी पाचच्या सुमारास बारामती शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने शहरासह परिसरातील अनेक ठिकाणची मोठी झाडे उन्मळून पडली. बारामती शहरातील अनेक सदनिकांच्या खिडक्यांच्या काचा पडल्या. बारामती शहरातील भिगवण रोडवरील मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडल्याने भिगवन कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

    परिसरातील आंब्याचे मोठे नुकसान झाले असून पिंपळी, काटेवाडी परिसरातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे अर्धा तास हा वादळी पाऊस सुरु होता. बारामती परिसरातील मोठ मोठी झाडे उन्मळून पडल्याने झाडाखाली असणाऱ्या अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. बारामती- भिगवण रस्त्यावर पडलेली झाडे काढण्यासाठी उशिरापर्यंत नगरपालिकेचे कर्मचारी प्रयत्न करत होते.

    दरम्यान, दोन दिवसांपासून वातावरणामध्ये प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. मंगळवारी (दि १०) सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर आज दुपारनंतर पूर्ण ढगाळ वातावरण तयार झाले होते. अचानक झालेल्या वादळी पावसामुळे विक्रेत्यांची व खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची मोठी धावपळ उडाली .