दौंड तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले; वीज कोसळल्याने बैलगाडी व ट्रॅक्टर जळून खाक

दौंड शहरासह (Daund City) तालुक्याच्या पूर्व भाग व इतर भागात विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने झोडपले. तर दौंड शहरातील स्वामी समर्थ नगर भागात वीज पडल्याने बैलगाडी व ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

    पाटस : दौंड शहरासह (Daund City) तालुक्याच्या पूर्व भाग व इतर भागात विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने झोडपले. तर दौंड शहरातील स्वामी समर्थ नगर भागात वीज पडल्याने बैलगाडी व ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. दौंड शहर, तालुक्यातील पाटस, कुरकुंभ मळद यासह दौंडच्या पूर्व भागात रात्री साडेसहा सातच्या सुमारास विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने सुरुवात केली.

    या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेला कांदा, फळबागा व पालेभाज्या व इतर शेतपिकांचे नुकसान झाले. तसेच दौंड शहरातील समर्थ नगर येथील लिंगाळीचे माजी सरपंच गणेश जगदाळे यांच्या घरासमोर वीज पडल्याने घरासमोर उभी असलेल्या बैलगाडीने पेट घेतला. काही क्षणात जागेचा आगडोंब हवेत पसरला. त्यामुळे या आगीत शेजारी असलेला ट्रॅक्टरला ही या आगेची झळ पोहोचली.

    यामध्ये बैलगाडी व ट्रॅक्टर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाल्याची दुर्घटना घडली आहे. दरम्यान, शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.