
गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार (Heavy Rain) बरसणाऱ्या वरुणराजामुळे दिंडोरी तालुक्यातील धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे शेती, पिण्याचे पाणी व औद्योगिक क्षेत्रातील पाणी वापराची समस्या सुटली आहे.
वणी : गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार (Heavy Rain) बरसणाऱ्या वरुणराजामुळे दिंडोरी तालुक्यातील धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे शेती, पिण्याचे पाणी व औद्योगिक क्षेत्रातील पाणी वापराची समस्या सुटली आहे. तालुक्यातील करंजवण ८३, पालखेड ८२, पुणेगाव ९४, वाघाड १००, ओझरखेड ७४ तर तिसगाव धरणात २९ टक्के इतका जलसाठा जमा झाला आहे.
वाघाड व पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची हानी, उत्पादनात घट याबरोबर पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरासाठी पाण्याची निकड भासेल असे चित्र निर्माण झाले होते. पर्जन्यराजाला पावसासाठी साकडे घातल्यामुळे पाऊस बरसल्याने आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कृषी उत्पादनासाठी सकारात्मक बाब मानण्यात येत असून, सद्यस्थितीतील धरणातील जलसाठ्यामुळे पाणी वापराची चिंता मिटली आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीबाणी व पाण्यावरुन संभाव्य संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. कारण तालुक्यातील धरणातून अनेकविध पिण्यासाठी पाण्याच्या योजना कार्यान्वित आहेत. औद्योगिक वापरही मोठा आहे.