संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

अखेर दोन महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मनमाड शहर परिसरात पावसाचे (Rain in Manmad) जोरदार आगमन झाले. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी बरसल्या मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि सुमारे एक तास मुसळधार पावसाने शहर परिसराला झोडपून काढले.

    मनमाड : अखेर दोन महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मनमाड शहर परिसरात पावसाचे (Rain in Manmad) जोरदार आगमन झाले. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी बरसल्या मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि सुमारे एक तास मुसळधार पावसाने शहर परिसराला झोडपून काढले. पावसाला सुरुवात होताच नेहमीप्रमाणे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संपूर्ण शहर अंधारात होते. पावसाने अचानक येऊन सर्वांना सुखद धक्का दिला. जोरदार पाऊस सुरु झाल्यामुळे बाजार पेठेत आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

    पावसाअभावी करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळणार असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे; मात्र नदी, नाले, ओढे अजूनही कोरडेच असून, विहिरींनीदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे पावसाअभावी निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई दूर होण्यासाठी सलग जोरदार पाऊस होण्याची नितांत गरज आहे. नदी, नाले अद्यापही कोरडे असून, विहिरींनीदेखील तळ गाठलेला आहे. त्यामुळे आगामी काळात सलग जोरदार पाऊस होणे अत्यंत गरजेचे आहे. तरच चारा, पाणीटंचाई दूर होईल.

    दोन महिने पावसाने मारली दडी 

    पावसाला सुरु झाल्यानंतर सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली. पुढेही चांगला पाऊस होईल या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी मका, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद यांसह इतर पिकांची पेरणी केली होती. तर अनेक शेतकरी मात्र जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत होते. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला होता. त्यामुळे पिके करूप लागल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले होते. शिवाय चारा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झालेला आहे.