
नागपूर : नागपूर शहराला मुसळधार (Heavy Rain in Nagpur) पावसाने झोडपून काढले. चार तासात ढगफुटीसारखा पाऊस बरसला. अंबाझरी तलावाचा काही भाग फुटला. रस्ते, फुटपाथ वाहून गेले. पावसामुळे दोन वृध्द महिलांना जीव गमवावा लागला. १४ जनावरेही पावसात वाहून गेली. ४०० जणांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. १०९ मिमी पावसाने शहराची अक्षरक्षः दाणादाण उडाली. अचानक आलेल्या संकटाने प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली.
एनडीआरएफ, एसडीआरएफसह लष्कराला पाचारण करण्यात आले. तातडीने बचावकार्य हाती घेऊन अनेकांचे जीव वाचविण्यात आले. सकाळी ८ नंतर पाऊस ओसरल्याने नागपूरकरांचे अधिक नुकसान टळले. मध्यरात्री २ ते पहाटे ५ च्या सुमारास वीजेच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस एवढा जोरदार होता की सकाळपर्यंत सबंध शहरालाच आपल्या वेढ्यात घेतले. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला.
डागा लेआऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, अंबाझरी लेआऊट, समता लेआऊट, कस्तुरबा लेआऊटसह आसपासच्या परिसरातील घरात सहा फूट शिरले. अनेकांनी पहाटे चारपासून सहा तास घराच्या छतावर काढले. गोरेवाडा, सोनेगाव, पूर्व नागपुरातील अनेक वस्त्या, उत्तर नागपुरातील अनेक भागही जलमय झाले. नाग, पिवळी नदी दुथडी भरून वाहत होती. व्यावसायिक मॉल्स, दुकाने, रूग्णालयात पाणी शिरले. मोरभवन बसस्थानक बससह पाण्यात बुडाले. पावसाचे पाणी घरात शिरल्याने पश्चिम नागपुरात दोन वृध्द महिलेचा मृत्यू झाला.