पुण्यात मुसळधार पाऊस; उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा

मागील दोन दिवस हुलकावणी दिलेल्या पावसाने (Rain in Pune) पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागात दमदार हजेरी लावली. सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या पावसाने शहराच्या अनेक भागातील रस्ते जलमय झाले. 

    पुणे : मागील दोन दिवस हुलकावणी दिलेल्या पावसाने (Rain in Pune) पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागात दमदार हजेरी लावली. सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या पावसाने शहराच्या अनेक भागातील रस्ते जलमय झाले.

    वादळीवारा, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात काही मिनिटे पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. या पावसाच्या सुरूवातीमुळे पेरणीपूर्वी मशागती सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

    मे महिन्यात उन्हाळी वळवाचा पाऊस पडतो. मात्र, यावर्षी एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे परिसरात प्रचंड उकाडा जाणवत होता. दररोज आभाळ भरुन येत असल्याने विहिरींची पाणीपातळी खालावली होती. शेतातील पिकांवर परिणाम होत होता. दुभत्या जनावरांचा हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

    भर उन्हाळ्यात यावर्षी नीरा डाव्या कालव्याला पाणी असल्याने नीरा नदी ते डावा कालवा दरम्यान ऊस पिकासह, पालेभाज्या, टोमॅटोची लागवड केली होती. यावर्षी पालेभाज्या व टोमॅटोचे उत्पन्न चांगले झाले आहे. पालेभाज्यांसह सर्व शेतमालाला दर वाढता असल्याने शेतकरी समाधानी होते. पुढील आठवड्यात नव्याने ऊस लागवडीच्या तयारीत आता नीरा परिसरातील शेतकरी आहेत.