Heavy rains disrupt life in Mahad

शिरोळ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने (Rain in Kolhapur) दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असला तरी गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु असल्याने अनेकजण महापुराच्या भीतीच्या छायेत असल्याचे सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे.

    शिरोळ : शिरोळ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने (Rain in Kolhapur) दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असला तरी गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु असल्याने अनेकजण महापुराच्या भीतीच्या छायेत असल्याचे सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. आज (दि.२०) एका दिवसात ३१८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

    तालुक्यात गेले अनेक दिवस ढगाळ वातावरण होते. मात्र, २० मे रोजी सायंकाळी विजेचा कडकडाट व वादळासह मोठ्या पावसाला सुरूवात झाली. ती २१ मे अखेर सुरूच होती. पावसाच्या या संततधारेने ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मागास लागण केलेल्या व काढणी न झालेल्या सोयाबीन पिकाला याचा तडाखा बसून नुकसान झाले आहे. मात्र, खरीप हंगामाची पिके करण्याकरिता हा पाऊस पूरक असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

    तसेच नुकसान झालेल्या पिकांचा सर्व्हे करण्याकरिता पथके तयार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी दिली.

    दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभाग ही पूर्वतयारी करत असल्याचे तालुका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. शिरोळ तालुक्यात सात महसूल मंडळ विभाग आहेत.