संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

सडावाघापूर (ता.पाटण) येथे झालेला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे येथील 20 पेक्षा जास्त घरांवरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सडावाघापूर येथे भेट देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

    पाटण : सडावाघापूर (ता.पाटण) येथे झालेला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे येथील 20 पेक्षा जास्त घरांवरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सडावाघापूर येथे भेट देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष भरत साळुंखे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    शंभूराज देसाई यांनी सडावाघापूर पठारावर प्रत्यक्ष भेट देत वादळी वारे व अवकाळी पावसाने पडझड झालेल्या घरांची पाहणी केली व ग्रामस्थांना दिलासा दिला. पठारावर झालेल्या नुकसानीची संपूर्ण माहिती घेत नुकसान भरपाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सडावाघापूर पठारावर वादळी वाऱ्याने घरांवरील पत्रे उडाले. प्रचंड वेगाने आलेल्या वाऱ्यामुळे घरावरील छत इतरत्र उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. गोरगरीब जनता सरकारी मदतीकडे आशेने पाहत होती. येथे सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

    अवकाळी पावसाने चाफळ विभागातील पाडळोशी, नारळवाडी, मसुगडेवाडी, तावरेवाडी, केळोली, सडाकळकी परिसराला चांगलेच झोडपून काढले. दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र, या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका डोंगर पठारावर असलेल्या सडावाघापूर या गावाला बसला असून, मोठे नुकसान झाले आहे.