पुण्यात विजांच्या गडगडटांसह मुसळधार पाऊस; गरमीने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा

पुण्यामध्ये विजांच्या गडगडटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

    पुणे : पुण्यामध्ये विजांच्या गडगडटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काल पासून पुण्याचे वातावरण ढगाळ होते. त्यामुळे शहरातील आद्रता देखील वाढली होती. त्यामुळे पुणेकरांना गरमीने हैराण केले होते. आज पुण्यामध्ये जोरदार वाऱ्यासह वरुणराजाने आगमन केले आहे. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच अनेक रस्त्यांवर झाडे कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

    काल देखील पुणे शहरात हलक्या सरी बरसल्या होत्या. आज मात्र पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. पावसापूर्वी सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यामध्ये अनेक झाडांची पडझड देखील झाली. त्याचबरोबर जोरदार विजांचा कडकडाट देखील होत आहे. पाऊस अचानक आणि जोरदार आल्यामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे आणि झाडे पडल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये वाहतूक कोंडी देखील झाली आहे.

    10 ठिकाणी झाडपडीच्या घटना 

    शहरामध्ये पावसाबरोबर वारा देखील जोरदार असल्यामुळे अनेक मोठ मोठी झाडे कोसळली आहेत. आत्तापर्यंत शहरात विविध ठिकाणी झाडपडीच्या 10 घटनांची नोंद घेण्यात आली आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अनेक झाडे वाहत्या रस्त्यावरुन बाजूला केली आहेत. पुण्यातील स्वारगेट येथील वेगा सेंटर तसेच पोलिस लाईन जवळ झाडपडी झाली. त्याचबरोबर गिरीजा शंकर सोसायटी कोथरुड, लोहियानगर, मक्का मस्जिद भवानी पेठ, कोंढवा खुर्द येथील शितल पेट्रोल पंपाजवळ अशा एकूण 10 ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेत झाडे बाजूला करत वाहतूक सुरळीत केली आहे.ठाकरे चौक येरवडा आय ट्वेंटी गाडीच्या टपावर झाड पडलं होतं. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.