प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

गेल्या दोन दिवसांपासून आष्टी शहरासह संपूर्ण तालुकाभरात मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला आहे. दुसऱ्याही दिवशी शनिवारी सायंकाळच्या सुमारास आष्टी तालुक्यातील खडकत, भाळवणी, बेलगाव या परिसरात जोरदार पाऊस झाला.

    आष्टी : गेल्या दोन दिवसांपासून आष्टी शहरासह संपूर्ण तालुकाभरात मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला आहे. दुसऱ्याही दिवशी शनिवारी सायंकाळच्या सुमारास आष्टी तालुक्यातील खडकत, भाळवणी, बेलगाव या परिसरात जोरदार पाऊस झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काही काळ दिलासा मिळाला आहे.

    वादळी वाऱ्याच्या पावसामुळे आष्टी परिसरातला वीज पुरवठाही खंडित झाला होता. दरम्यान हनुमंतगाव येथे शेतातील गहू झाकायला गेलेल्या शांताबाई बापुराव खेमगर (वय ७० वर्ष) यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून प्रचंड उकाडा, ऊन वाढल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. अशातच मोठ्या प्रमाणात उकाडा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे.

    शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात आष्टी तालुक्यात प्रचंड उकाडा वाढलाय. तापमानाचा पारा ही मोठ्या प्रमाणात वाढला. शुक्रवारी सायंकाळी अनेक गावात जोरदार पाऊस पडला. शनिवारीही सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. उकडाही मोठ्या प्रमाणात जाणवत होता. सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या तालुक्यातील खडकत भाळवणी बेलगाव आष्टी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.

    शेती पिकांचे नुकसान

    आष्टी तालुक्यामध्ये सलग दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह पाऊस होऊ लागला आहे. परिणामी चिखली गावातील संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच अन्य पिकांच्या नुकसान झाले आहे. वेळीच प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.