मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस; आंब्याचं मोठं नुकसान

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी ११.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर जालना जिल्ह्यात सरासरी ३.६ व बीड जिल्ह्यात सरासरी ०.९ मिलिमीटर पाऊस झाला. एक- दोन ठिकाणी वादळामुळे झाडे उन्मळून पडली. तर आंबा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आली आहे.

    औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत गुरुवारी सायंकाळनंतर व रात्री उशिरा मेघगर्जनेसह पाऊस बरसला. औरंगाबाद जिल्ह्यात एक- दोन ठिकाणी वादळामुळे झाडे उन्मळून पडली. तर आंबा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आली आहे.

    दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी ११.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर जालना जिल्ह्यात सरासरी ३.६ व बीड जिल्ह्यात सरासरी ०.९ मिलिमीटर पाऊस झाला. दोन दिवसांपासून मराठवाड्यातील काही भागात मॉन्सूनपूर्व पाऊस पडतो आहे. गुरुवारी सायंकाळी चार नंतर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव, वैजापूर, खुलताबाद, औरंगाबाद व सिल्लोड तालुक्यातील काही भागात वादळासह पाऊस झाला. पिशोर परिसरात पावसामुळे लहान मोठी झाडे उन्मळून पडली.

    या फळांच्या झाडांना वादळी पावसाचा फटका

    सोनगिरी टेकडीवरील पाण्याच्या जलकुंभाशेजारील झाडे कोसळली. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन उघडल्या गेल्या. त्यामुळे शुक्रवारी पिशोर गावाला होणारा पाणीपुरवठा बंद राहिला. परिसरातील आंबा, चिकू आदी फळांच्या झाडांना या वादळी पावसाचा फटका बसला. रात्री आठ वाजता पावसाचा जोर कमी झाला. या पावसाने शेतात पाणी तुंबले. लहान ओढ्यातून पाणी वाहिले.

    चिंचोली लिंबाजी परिसरात तसेच नेवपूर, वाकी, घाटशेंद्रा, रेउळगाव, तळनेर, टाकळी, अंतुर, लोहगाव, भरतपूर, बाळखेडा, गणेशपूर, दहेगाव, जांभळी परिसरात सायंकाळी पाऊस झाला. नेवपूर येथील येथील चिकूच्या बागा तसेच कारले, दोडके, गिलके, टोमॅटो यांचे बांधलेले मंडप वादळामुळे कोलमडून पडले. वैजापूर शहराला जवळपास तासभर जोरदार पावसाने झोडपून काढले. काही ठिकाणी झाडे व विजेचे पोल कोसळले. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. आडगाव बुद्रूक परिसरात जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा सुटल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. गोंदेगाव, पहुरी, घोरकुड, वाकडी आदी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.