सलग सुट्ट्यांमुळे खंबाटकी घाटात मोठी कोंडी; सुमारे आठ तास वाहतूक धीम्या गतीने

नाताळ सण आणि सलग सुट्ट्यांमुळे खंबाटकी घाटात सुमारे आठ तास धीम्या गतीने वाहतूक सुरु होती. दरम्यान, काही वेळ वाहतूकीची कोंडी झाल्याने सात किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे दिसून आले.

  खंडाळा : नाताळ सण आणि सलग सुट्ट्यांमुळे खंबाटकी घाटात सुमारे आठ तास धीम्या गतीने वाहतूक सुरु होती. दरम्यान, काही वेळ वाहतूकीची कोंडी झाल्याने सात किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे दिसून आले.

  आशियाई महामार्गावर पुणे-मुंबईहून सातारा कोल्हापुरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पर्यटक व चाकरमानी निघाल्याने महामार्गावर शनिवारी वाहनांची वर्दळ होती. सकाळी आठपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत वाहतुक अत्यंत धीम्या गतीने सुरु होती. महामार्ग पोलीस व खंडाळा पोलीसांनी पहाटेपासुन वाहतुकीचे नियंत्रण केल्याने वाहतुक सुरळीत असल्याचे दिसून आले.

  खंबाटकी घाटातील दत्तमंदिर, खामजाई मंदीर परिसरात फक्त शंभर मीटर अंतरातील घाटरस्त्याचे रुंदीकरण झाले नसल्याने दर शनिवार, रविवार व सलग सुट्टीच्या कालावधीमध्ये येथे कायमच वाहतुक कोंडी होऊन घाट रस्ता मार्गक्रमण करण्यासाठी वाहनांना अधिक वेळ लागतो . या महामार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यात सलग सुट्ट्यांच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांकडे नागरिकांचा ओघ वाढतो. वर्षाखेर, नाताळच्या सुट्ट्या व जोडून आलेला शनिवार, रविवार यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरातील नागरीक आपल्या कुटुंबासमवेत पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. त्यामुळे सर्व मार्गांवर वाहनांची वर्दळ दिसुन आली. शनिवारी पहाटेपासुन महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने जात होती. दुचाकी, चारचाकी, ट्रॅव्हल्स, बसेस, मालवाहक ट्रक, ट्रेलर, कंटेनर अशी अवजड वाहने खंबाटकी घाटातुन मार्गक्रमण करत होती. दत्तमंदीर परिसरात आल्यावर दोन लेनचा रस्ता असल्याने व तीव्र वळण असल्याने पाठीमागे वाहनांच्या रांगा लागत होत्या.

  यावेळी महामार्ग पोलीस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे, वर्षा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक हणमंत शिंदे, निलेश गायकवाड, खंडाळा पोलीस ठाण्याचे राजेंद्र अहिरराव, प्रकाश फरांदे, नितिन महांगरे, दत्तात्रय धायगुडे यांनी चार वाजण्याच्या सुमारास वाहतूक पूर्ववत केली.

  वाहनधारकांना अर्थिक भुर्दंड?

  खंबाटकी घाटात वाहन बंद पडण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे वाहनाच्या रांगा लागल्यास प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र, बंद पडलेली वाहने बाजूला करण्यासाठी खासगी क्रेनचा आधार घ्यावा लागतो. त्यातून वाहनधारकांस अर्थिक भुर्दंड हा सहन करावा लागत असल्याची चर्चा सुरु आहे.

  क्रेनची मागणी…

  महामार्गावर असणऱ्या खंबाटकी घाटात गर्दीच्या वेळी अथवा वाहन बंद पडल्यास रस्ता जाम होवून वाहतूक कोंडी होते. यावेळी क्रेनची गरज भासते. महामार्ग प्राधिकरणाची क्रेन उपलब्ध होत नसल्याने खासगी क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करून रस्ता खुला करावा लगातो. वाहनधारकांना नाहक होणारा त्रास कमी व्हावा, प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी. यासाठी कायम स्वरूपी दत्त मंदिराजवळ क्रेन उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.